

सेंट लुईस : भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदला सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्ध टायब्रेकरमध्ये निर्णायक डावात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह प्रज्ञानंदला उपविजेतेपदावर समाधानी राहावे लागले. वेस्लीने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेत अंतिम क्लासिकल डावात नेदरलँड्सच्या अनिश गिरीविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर प्रज्ञानंदने गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या वेस्ली सोविरुद्ध टायब्रेकर गाठला होता. स्पर्धेच्या नियमांनुसार टायब्रेकरमध्ये आधी दोन रॅपिड डाव खेळवले गेले. दोन्ही रॅपिड डाव १-१ असे बरोबरीत सुटल्याने विजेत्याच्या निर्णयासाठी अंतिम आर्मागेडॉन डाव खेळवण्यात आला.
नियमानुसार पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या खेळाडूला पाच मिनिटे आणि काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्याला चार मिनिटे दिली जातात. तसेच डाव अनिर्णित राहिल्यास काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित केले जाते. या निर्णायक डावात प्रज्ञानंदकडे पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना विजयाची कठीण संधी होती, मात्र सामना अनिर्णित राहिल्याने काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या वेस्ली सोला विजेता घोषित करण्यात आले.
उपविजेतेपदावर समाधानी राहावे लागले असले तरी, प्रज्ञानंदने संपूर्ण टूरच्या शेवटी अव्वल स्थान पटकावले आहे. प्रज्ञानंदने एकूण टूरमध्ये ३५.५ गुण मिळवले असून तो वेस्ली सोपेक्षा एक पूर्ण गुणाने पुढे राहिला. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तो या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना तिसऱ्या, तर जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर चौथ्या स्थानावर राहिला असून, हे अव्वल चार खेळाडू आता ग्रँड फिनालेमध्ये आमनेसामने येतील.
नवव्या फेरीत वेस्ली सो आणि उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील सामना अनिर्णित राहिला, तर प्रज्ञानंदने अनिश गिरीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. वेस्ली सोच्या भक्कम बचावामुळे सिंदारोव्हला काळ्या मोहऱ्यांनी विजय मिळवता आला नाही. अखेरीस मात्र वेल्सीनेच बाजी मारली.