नदालचा पराभवासह टेनिसला अलविदा; २४ वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्त, डेव्हिस चषकात स्पेन पराभूत

दोन दशकांहून अधिक काळ टेनिस विश्वावर राज्य करणाऱ्या राफेल नदालच्या कारकीर्दीचा शेवट मात्र अपयशी ठरला. दुखापतीवर मात करून अखेरच्या डेव्हिस चषक लढतीत खेळणाऱ्या नदालला एकेरीत आणि उपांत्यपूर्व लढतीत स्पेनला नेदरलँड्सकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.
नदालचा पराभवासह टेनिसला अलविदा; २४ वर्षांच्या कारकीर्दीनंतर निवृत्त, डेव्हिस चषकात स्पेन पराभूत
Published on

माद्रिद : दोन दशकांहून अधिक काळ टेनिस विश्वावर राज्य करणाऱ्या राफेल नदालच्या कारकीर्दीचा शेवट मात्र अपयशी ठरला. दुखापतीवर मात करून अखेरच्या डेव्हिस चषक लढतीत खेळणाऱ्या नदालला एकेरीत आणि उपांत्यपूर्व लढतीत स्पेनला नेदरलँड्सकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.

गेली २४ वर्षे तमाम क्रीडाप्रेमींच्या मनावर अविरत राज्य करणारे ‘लाल वादळ’ अखेर थंडावले. कोणत्याही स्थितीत हार न मानण्याची जिद्द, चिकाटी आणि खडूस वृत्ती या त्रिसूत्रीच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्पेनचा तारांकित नदालने गेल्या महिन्यात वयाच्या ३८व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. ‘लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट’ म्हणजेच ‘किंग ऑफ क्ले’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालने कारकीर्दीत विक्रमी १४ वेळा लाल मातीवर खेळवण्यात येणाऱ्या फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. त्यामुळेच नदालला ‘लाल मातीचा बादशहा’ असे नाव पडले.

घरच्या मैदानावर खेळताना नदालला यशस्वी निरोप देण्यापासून त्याचे सहकारीदेखील अपयशी ठरले. स्पेनचा केवळ कार्लोस अल्कराझच विजय मिळवू शकला. स्पेन आणि नदालचा पराभव झाला असला तरी कोर्ट ‘राफा... राफा... राफा...’च्या घोषणांनी दणाणून गेले होते. सेंटर कोर्टवर नदालला निरोप देण्यासाठी एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा चाहत्यांशी हितगुज केल्यानंतर नदालला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

“माझ्या छंदातून कारकीर्द घडविण्यात यशस्वी ठरलो. कधीही कल्पना केली नव्हती त्यापेक्षा अधिक काळ खेळल्याबद्दल मी स्वत:ला धन्य मानतो आणि सर्व चाहत्यांचे आभार मानतो. तुम्ही सर्व सदैव माझ्या मागे ठामपणे उभे राहिलात म्हणून मी इतकी वर्षे टिकू शकलो,” असे नदाल म्हणाला.

निरोप समारंभ आटोपल्यानंतर नदालने आपल्या सर्व सहकाऱ्यांना मिठी मारली आणि चाहत्यांचे आभार मानत टेनिस कोर्टचा निरोप घेतला. दुखापतीच्या कारणाने नदालच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, अखेरच्या क्षणी नदालने खेळण्याचा निर्णय घेतला. डेव्हिस चषक लढतीत सलग २९ एकेरीच्या लढती जिंकल्यानंतर नदालला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला.

झळाळती कारकीर्द

सुरुवात : २००१ (वय १५ वर्षे)

शेवट : २०२४ (वय ३८ वर्षे)

ग्रैंडस्लॅम जेतेपदे : २२

ऑलिम्पिक सुवर्णपदक : २ (२००८, २०१६)

डेव्हिस चषक जेतेपद : ४ (२००४, २००९,

क्रमवारीत अग्रस्थान : २०९ आठवडे (एकंदर ५ वेळा)

अन्य विजेतेपदे : ९२ पटीपी, ३६ मास्टर्स स्पर्धा

सलग ५ वेळा आणि विक्रमी १४ वेळा फ्रेंच ऑपन जिंकणारा एकमेव टेनिसपटू.

आमनेसामने वि. जोकोव्हिच : ६० सामन्यांत २९ विजय, ३१ पराभवः

आमनेसामने वि. फेडरर : ४० सामन्यांत २४ विजय, १६ पराभव

logo
marathi.freepressjournal.in