
नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघात पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच आता खडतर इंग्लंड दौरा येत असून भारताला आव्हानात्मक स्थितीत इंग्रजांविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पूर्णपणे युवा फलंदाजांवर विसंबून राहण्यापेक्षा निवड समितीने किमान या मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंना पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी चाहते आणि माजी क्रिकेटपटू करत आहेत.
२० जूनपासून भारत-इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. २०२५ ते २०२७च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धेच्या दोन वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेला या मालिकेद्वारे प्रारंभ होईल. यापूर्वी भारताने २०२१ व २०२३ मध्ये डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच २०२५च्या अंतिम फेरीसाठी तर भारतीय संघ पात्रही ठरू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात भारताने ०-३ असा दारुण पराभव स्वीकारला, तर डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने १-३ अशी गमावली. परिणामी रोहित व विराट यांनीही सुमार कामगिरी आणि भविष्याचा विचार करता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर नवा कर्णधार निवडण्यासह फलंदाजीत युवा व अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधण्याचेही आव्हान असेल.
रोहित सलामीला, तर विराट चौथ्या स्थानी फलंदाजी करायचा. त्यामुळे आता रोहितच्या अनुपस्थितीत सलामीला यशस्वी जैस्वालसह के. एल. राहुलचे स्थान पक्के मानले जात आहे. मात्र मधल्या फळीत विराटची उणीव भारताला प्रकर्षाने जाणवू शकते. इंग्लंडच्या खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांना पोषक असून तेथे स्विंग होणाऱ्या व उसळणाऱ्या चेंडूंसमोर युवा फलंदाज ढेपाळू शकतात. त्यामुळेच चाहत्यांनी मुंबईकर रहाणे किंवा सौराष्ट्रचा अनुभवी पुजारा यांच्या पुनरागमनाची मागणी केली आहे. या दोघांपैकी एकाला तरी संघात स्थान मिळाल्यास इंग्लंड दौऱ्यात मधल्या फळीत हा प्रयोग भारतासाठी उपयुक्त ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.
भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी दावेदार असलेला शुभमन गिल तिसऱ्या स्थानी फलंदाजी करू शकतो. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर ३६ वर्षीय रहाणेला संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये रहाणे उत्तम लयीत असून रणजी हंगामात त्याची कामगिरी संमिश्र स्वरुपाची राहिली. जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध रहाणेने अखेरची कसोटी खेळली आहे. त्यानंतर भारताने युवा खेळाडूंवर भरवसा दर्शवल्याने रहाणे व पुजारा यांनी कसोटी संघातील स्थान गमावले. पुजारा जून २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. हीच लढत २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी होती. रहाणेने ८५ कसोटींमध्ये ३८च्या सरासरीने १२ शतकांसह ५,०७७ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये त्याने यापूर्वीही छाप पाडली आहे. तर पुजाराने १०३ कसोटींमध्ये ४३च्या सरासरीने १९ शतकांसह ७,१९५ धावा केल्या आहेत.
तूर्तास, भारताकडे मुंबईचे सर्फराझ खान, श्रेयस अय्यर यांनाही मधल्या फळीत संधी देण्याचा पर्याय आहे. त्याशिवाय साई सुदर्शनही कसोटीसाठी तयार दिसत आहे. करुण नायरला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र पुजारा किंवा रहाणेपैकी एका अनुभवी खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संधी दिली, तर तो निर्णय संघासाठी नक्कीच लाभदायी ठरू शकतो.
चौथ्या स्थानासाठी रहाणे योग्य : चोप्रा
भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने रहाणेचा चौथ्या स्थानी वापर करण्याचे सुचवले आहे. तसेच फक्त या एका मालिकेसाठी नव्हे, तर यापुढेही रहाणे कसोटी संघात स्थान टिकवून ठेवू शकतो, असे चोप्राचे मत आहे. मात्र भारताने पूर्णपणे युवा खेळाडूंभोवती संघ बांधण्याचे धोरण स्वीकारले असेल, तर साई सुदर्शनने तिसऱ्या व गिलने चौथ्या स्थानी फलंदाजी करावी, असेही त्याने सुचवले.
पुजाराला प्राधान्य द्यावे : क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने पुजाराला कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे सुचवले आहे. “आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे खेळाडूंची कसोटीसाठी निवड करू नका, ज्याच्याकडे अनुभव आहे, त्याला प्राधान्य द्या. पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी स्पर्धेतही खेळतो. रोहित, विराटच्या अनुपस्थितीत तो फलंदाजीला तारू शकतो,” असे क्लार्कने सांगितले.