द्रविड राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी

भारताच्या विश्वविजेत्या टी-२० संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडची शुक्रवारी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली.
द्रविड राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी
X
Published on

नवी दिल्ली : भारताच्या विश्वविजेत्या टी-२० संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडची शुक्रवारी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली.

५१ वर्षीय द्रविड २०२१ ते जून २०२४पर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ न वाढवण्याची विनंती बीसीसीआयला केली. आता द्रविड पुन्हा आयपीएलकडे वळला असून तो किमान दोन वर्षांसाठी राजस्थानचे प्रशिक्षकपद भूषवणार असल्याचे समजते.

द्रविड खेळाडू म्हणूनही एकवेळ राजस्थानचा भाग होता. २०११ ते २०१३मध्ये तो राजस्थानकडून खेळला. तसेच २०१४च्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थानचे प्रशिक्षकपद भूषवले होते. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा राजस्थानचा क्रिकेट संचालक असून त्याच्या साथीने द्रविन राजस्थानला २००८नंतर पुन्हा आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यास आतुर असेल. "राजस्थानच्या ताफ्यात पुन्हा परतताना आनंद होत आहे.

विश्वविजयानंतर स्वतःसह कुटुंबाला अधिक काळ देण्यात यावा, या हेतूने मी फक्त आयपीएलमधील प्रशिक्षकपद स्वीकारले आहे. या आव्हानासाठी मी सज्ज आहे," असे द्रविड म्हणाला. राजस्थान संघाचे मालक जॅक लूश यांच्या उपस्थितीत द्रविडला शुक्रवारी बंगळुरू येथे विशेष जर्सी देत परिवारात स्वागत करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in