राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण;भारतीय संघाला जबरदस्त धक्का

कोरोना चाचणीत द्रविड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ते भारतीय संघासोबत जाणार की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती
राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण;भारतीय संघाला जबरदस्त धक्का

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाल्याने येत्या २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार असतानाच भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. मंगळवारी युएईला रवाना झालेल्या भारतीय संघासोबत द्रविड जाऊ शकले नाहीत.

कोरोना चाचणीत द्रविड यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ते भारतीय संघासोबत जाणार की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. या स्पर्धेदरम्यान संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यताही व्यक्त होती. सहप्रशिक्षक पारस म्हांब्रे हे देखील मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा वाहणार असल्याचे सांगण्यात येत होते. भारतीय संघ द्रविड यांच्याविनाच युएईला रवाना झाला.

द्रविड यांची यूएईला जाण्यापूर्वी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आशिया कपमधून द्रविड बाहेर राहण्याची शक्यता आहे. मात्र, बीसीसीआयकडून राहुल द्रविडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही. मात्र, बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते संघासोबत जोडले जातील.

मंगळवारी सकाळी कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडू दुबईसाठी रवाना झाले. आशिया कप स्पर्धेत खेळणारे भारताचे अनेक खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यावर आहेत. सोमवारी भारताने झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका ३-०ने जिंकली. या संघातील आशिया चषक स्पधेत खेळणारे खेळाडू हरारे येथून थेट दुबईला जाणार आहेत.

यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी होती. शिवाय, लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

आशिया चषक स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी होईल. दरम्यान, सुपर ४ साठी ६ सामने खेळविले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना ३ सप्टेंबर रोजी शारजामध्ये होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता उर्वरित सर्व सामने दुबईत होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in