
नवी दिल्ली: आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने शनिवारी द्रविड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली.
२०२५ च्या हंगामापासून द्रविड यांच्या खांद्यावर रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. मात्र एका वर्षातच त्यांनी रॉयल्सची साथ सोडली आहे.
राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या प्रवासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाने त्या पिढीतील खेळाडूंवर प्रभाव टाकला आहे. संघासाठी त्यांनी मौल्यवान कामगिरी केली आहे, असे रॉयल्सने एक्स अकाऊंटवर पोस्ट केले आहे.
राजस्थान रॉयल्सने निवेदनात पुढे म्हटले आहे, राहुल यांना मोठी भूमिका देण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. राहुल द्रविड यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे मनापासून आभार.
कर्णधार संजू सॅमसन हा देखील राजस्थान सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जर संजू सॅमसनने देखील संघ सोडण्याचा निर्णय घेतल्यास राजस्थान रॉयल्सला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत. या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, गुलाबी जर्सीत तुम्ही नेहमीच युवा आणि अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहात.
गत हंगामात रॉयल्सची कामगिरी निराशाजनक
राहुल द्रविड यांनी याआधी देखील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा एकदा या पदावर परतले होते. गत हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी निराशाजनक झाली. गुणतालिकेत त्यांचा संघ नवव्या स्थानी होता.