नवी दिल्ली : भारताला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा या त्रिकुटाला श्रीलंका दौऱ्यातही विश्रांती देण्यात येणार असल्याचे समजते. एकदिवसीय मालिकेत के. एल. राहुल, तर टी-२० मालिकेत हार्दिक पंड्या भारताचे कर्णधारपद भूषवू शकतो.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने जूनमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. या स्पर्धेतील अंतिम लढतीत विराट कोहली सामनावीर ठरला, तर बुमराला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. विश्वचषकानंतर रोहित, विराट यांनी टी-२०तून निवृत्ती जाहीर केली. तसेच बुमरालाही सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. आता २६ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. मात्र भारतात सप्टेंबरपासून सुरू होणारा भरगच्च कार्यक्रम आणि वर्षाखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेचा विचार करता रोहित, विराट, बुमरा यांना ठरावीक मालिकांमध्येच खेळवण्यात येणार असल्याचे समजते.
भारत-श्रीलंका यांच्यात २६, २७ व २९ जुलै रोजी पालेकेले येथे टी-२०, तर १, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७, तर एकदिवसीय सामने दुपारी २.३० वाजता सुरू होतील. २०२१नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून नवा प्रशिक्षक गौतम गंभीरसुद्धा या दौऱ्यापासूनच प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. राहुल एकदिवसीय संघाचा सातत्याने भाग असल्याने तो या संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. तर टी-२० विश्वचषकात हार्दिक उपकर्णधार होता. त्यामुळे त्याच्याकडे आता नेतृत्व सोपवले जाऊ शकते. या मालिकांसाठी लवकरच भारताचे संघ जाहीर करण्यात येतील.
श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशातच २ कसोटी व ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाईल. तेथूनच मग नोव्हेंबरच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे.
भारताचा श्रीलंका दौरा
पहिला टी-२० सामना : शुक्रवार, २६ जुलै
दुसरा टी-२० सामना : शनिवार, २७ जुलै
तिसरा टी-२० सामना : सोमवार, २९ जुलै
पहिला एकदिवसीय : गुरुवार, १ ऑगस्ट
दुसरा एकदिवसीय : रविवार, ४ ऑगस्ट
तिसरा एकदिवसीय : बुधवार, ७ ऑगस्ट