ट्वेन्टी-२० विश्वचषकात सलामीसाठी राहुललाच पसंती; भारताचा कर्णधार रोहितचे संकेत

तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार असून त्या पार्श्वभूमीवर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला
ट्वेन्टी-२० विश्वचषकात सलामीसाठी राहुललाच पसंती; भारताचा कर्णधार रोहितचे संकेत

ट्वेन्टी-२० विश्वचषकात कर्णधार रोहित शर्माच्या साथीने कुणी सलामीला यावे, याबाबत सर्वच जण तर्क-वितर्क लावत असताना स्वत: रोहितने मात्र के. एल. राहुललाच पसंती दिली आहे. त्याशिवाय विराट कोहलीलासुद्धा काही सामन्यांसाठी सलामीला उतरण्याची संधी नक्की मिळेल, असे रोहितने सांगितले.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवार, २० सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार असून त्या पार्श्वभूमीवर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. पुढील महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून अनेकांनी रोहित-विराट, रोहित-ऋषभ पंत यांसारख्या विविध पर्यायांना सलामीवीर म्हणून पसंती दर्शवली आहे. मात्र रोहितने संघ व्यवस्थापनाचे धोरण स्पष्ट करताना राहुललाच सुरुवातीच्या सामन्यांत सलामीवीर म्हणून प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

“प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच अन्य संघसहकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वचषकात माझ्या साथीने राहुलच सलामीस येईल. विराटलासुद्धा स्पर्धेची स्थिती पाहून सलामीस उतरण्याची संधी देता येईल,” असे रोहित म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. २३ ऑक्टोबर रोजी भारताची सुपर-१२मधील पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.

दरम्यान, राहुल गेल्या काही महिन्यांपासून दुखापती तसेच कोरोनाने त्रस्त होता. त्यानंतर आशिया चषकात त्याला छाप पाडता आली नाही. त्याच्या खेळण्याच्या गतीवरसुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याउलट, कोहलीने आशिया चषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत सलामीची संधी मिळताच कारकीर्दीतील ७१वे शतक झळकावले. आयपीएलमध्येही कोहली बंगळुरूकडून सलामीला फलंदाजी करतो.

सहा सामन्यांत स्वत:ला झोकून द्या!

विश्वचषकापूर्वी भारताकडे अखेरचे सहा ट्वेन्टी-२० सामने शिल्लक असून या लढतींमध्ये सर्वांनी स्वत:ला झोकून देत खेळाचा स्तर वाढवावा, असे रोहितने संघसहकाऱ्यांना सांगितले. “ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्ध प्रामुख्याने विश्वचषकात अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवण्याची शक्यता असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. या खेळाडूंनी आता सगळी मरगळ झटकून सहाही लढतींमध्ये सर्वोत्तम खेळ करावा,” असे रोहित म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in