विक्रमांचा पाऊस; भारतीय महिला संघाचा आयर्लंडला क्लीन स्विप

कर्णधार स्मृती मानधना (८० चेंडूंत १३५ धावा) आणि प्रतिका रावल (१२९ चेंडूंत १५४ धावा) या सलामीच्या जोडीने केलेल्या विक्रमी २३३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी धावांचा ऐतिहासीक एव्हरेस्ट रचला.
विक्रमांचा पाऊस; भारतीय महिला संघाचा आयर्लंडला क्लीन स्विप
Published on

राजकोट : कर्णधार स्मृती मानधना (८० चेंडूंत १३५ धावा) आणि प्रतिका रावल (१२९ चेंडूंत १५४ धावा) या सलामीच्या जोडीने केलेल्या विक्रमी २३३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी धावांचा ऐतिहासीक एव्हरेस्ट रचला. तो सर करताना नवख्या आयर्लंडचा संघ अवघ्या १३१ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील हा अखेरचा सामना ३०४ धावांच्या विक्रमी फरकाने जिंकत भारतीय महिला संघाने आयर्लंड महिला संघाला ३-० असा क्लिन स्वीप दिला. मालिकेतील शेवटच्या या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले.

मानधनाने या सामन्यात ७० चेंडूंत शतक झळकावले. भारताने निर्धारित ५० षटकांत ५ फलंदाज गमावून ४३५ धावांचा विक्रम केला. आयर्लंडचा डाव ३१.४ षटकांत १३१ धावांवर आटोपला.

स्मृती मानधनाने १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने अवघ्या ८० चेंडूंत १३५ धावांची वादळी खेळी खेळली. तिची सहकारी दुसरी सलामीवीर प्रतिका रावलने २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२९ चेंडूंत १५४ धावा फटकवल्या. भारताने या सामन्यात ५ फलंदाज गमावून विक्रमी ४३५ धावा जमवल्या. भारताच्या पुरुष किंवा महिला संघांची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. भारतीय पुरुष संघाने २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध ५ फलंदाज गमावून ४१८ धावा केल्या होत्या.

मानधना आणि रावल जोडीने २६.४ षटकांत २३३ धावांची भागीदारी रचली. आपल्या सहाव्या सामन्यातच प्रतिकाने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

फिरकीपटू तनुजा कनवर (२/३१) आणि दीप्ति शर्मा (३/२७) या जोडीने आयर्लंडची फलंदाजी उद्धवस्त केली.

२४ धावांवर २ फलंदाज बाद अशा अडचणीत आयर्लंडचा संघ सापडला होता. त्यावेळी ओरला प्रेंडरगेस्ट (३६ धावा) आणि सराह फोर्ब्स (४१ धावा) या जोडगोळीने तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी करत संघाची धावसंक्या ८८ वर नेली. परंतु कनवरने प्रेंडरगेस्टला माघारी धाडल्यानंतर भारताने पाहुण्यांना अडचणीत टाकले. अवघ्या ३३ धावांमध्ये उर्वरित ७ फलंदाज बाद केले. त्यामुळे २४९ धावांच्या मोठ्या फरकाने भारताने पाहुण्या संघाला पराभवाचा चेहरा दाखवला. प्रतिकाने पॉइंट रिजनमध्ये अप्रतिम फटकेबाजी केली. शतक झळकावल्यानंतर ती अधिक आक्रमक झाली. तिच्यात मोठी खेळी खेळण्याची भूक असल्याचे तिने या खेळीतून दाखवून दिले. संयम आणि आक्रमकता याचा मिलाफ तिच्या खेळीत दिसून आला. सलामीच्या या २३३ धावांच्या भागीदारीमुळे महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावांची भागीदारी नोंदवणारी ही चौथी भारतीय जोडी ठरली. या दोघींनी ‘पॉवर प्ले’मध्ये ९० धावा जोडल्या आणि त्यानंतरच्या १० षटकांत ६७ धावा जमवल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्याचा लाभ रिचा घोषने उचलला. तिने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमधील तिचे हे पाचवे अर्धशतक ठरले.

संक्षिप्त धावफलक

भारत ५० षटकांत ५ बाद ४३५ धावा (प्रतिका रावल १५४ धावा, स्मृती मानधना १३५ धावा; ओरला प्रेंडरगेस्ट २/७१) वि.

आयर्लंड ३१.४ षटकांत सर्वबाद १३१ (सराह फोर्ब्स ४१ धावा; दीप्ती शर्मा ३/२७, तंजुआ कंवर २/३१.

मानधना आणि रावल या जोडीने केलेली २३३ धावांची भागीदारी ही भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी दीप्ति शर्मा आणि पूनम राऊत यांनी २०१७ मध्ये ३२० धावांची भागीदारी रचली होती. १९९९ मध्ये रेश्मा गांधी आणि मिताली राज या जोडीने २५८ धावा जमवल्या होत्या.

अवघ्या ७० चेंडूंत शतकी बॅट उंचावत डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाने हरमनप्रीत कौरच्या वेगवान ८७ चेंडूंतील शतकाला मागे टाकले. हरमनप्रीतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील स्मृतीचे हे दहावे शतक ठरले.

भारतीय महिला संघाने बुधवारी राजकोट येथे झालेल्या सामन्यात आयर्लंडला विक्रमी ३०४ धावांनी पराभूत केले. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने आयर्लंडला २४९ धावांनी मात दिली होती. बुधवारचा भारताचा विजय हा महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा सर्वात मोठा विजय ठरला.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताआधी केवळ न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांनी ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आता त्यात भारताची भर पडली असून अशी कामगिरी करणाऱ्या संघांची संख्या तीनवर पोहचली आहे.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीडशे धावा करणारी प्रतिका रावल ही भारताची तिसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी दीप्ति शर्माने आयर्लंडविरुद्ध १८८ धावा आणि हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावा जमवल्या होत्या.

भारताने प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी भारताने आयर्लंडविरुद्ध ५ विकेट गमावून ३७१ धावा केल्या होत्या. मात्र बुधवारी ५ फलंदाज गमावून ४३५ धावा जमवत भारतीय महिलांनी विक्रमी धावसंख्या उभारली आहे.

logo
marathi.freepressjournal.in