हुलूनबुईर (चीन) : युवा आघाडीवीर राज कुमार पाल याने झळकावलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत जागा मिळवली. या सामन्यात भारताने मलेशियाचा ८-१ असा धुव्वा उडवला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर भारतीय हॉकी संघाची सुस्साट घोडदौड कायम आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग तीन विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. भारताच्या या विजयात राज कुमार (तिसऱ्या, २५व्या आणि ३३व्या मिनिटाला), अरायजीत सिंग हुंडाल (सहाव्या आणि ३९व्या मिनिटाला), जुगराज सिंग (सातव्या मिनिटाला), कर्णधार हरमनप्रीत सिंग (२२व्या मिनिटाला) आणि उत्तम सिंग (४०व्या मिनिटाला) यांनी गोल लगावले. मलेशियाकडून एकमेव गोल अखीमुल्ला अनुअर याने ३४व्या मिनिटाला केला.
या विजयासह भारताने तिसऱ्या विजयासह नऊ गुणांसह अग्रस्थान काबीज केले आहे. सहा संघामध्ये होणारी ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीचे तर १७ सप्टेंबर रोजी अंतिम लढत रंगणार आहे. याआधी भारताने यजमान चीनचा ३-० असा तर जपानचा ५-१ असा पाडाव केला होता. आता साखळी फेरीतील भारताची पुढची लढत गुरुवारी कोरियाशी आणि शेवटची लढत शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल.
मलेशियाविरुद्ध भारताला २०२३च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ १-३ अशा पिछाडीवर होता. मात्र भारतीय हॉकी संघाने जोमाने मुसंडी मारत ४-३ अशा विजयासह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. यंदा मात्र भारताचे आघाडीवीर जबरदस्त फॉर्मात आहेत. भारताने या सामन्यात पाच मैदानी गोल लगावले तर तीन गोल पेनल्टीकॉर्नरवर केले. जुगराज, हरमनप्रीत आणि उत्तम यांनी पेनल्टीकॉर्नरचे गोलात रूपांतर केले. पहिल्या मिनिटापासूनच भारतीय संघाने मलेशियाच्या गोलक्षेत्रात हल्ले चढवले. त्यामुळे पहिल्या १० मिनिटांच्या खेळातच भारताने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली होती.
राज कुमारने तिसऱ्याच मिनिटाला सुरेख चाल रचत स्वबळावर चेंडूला मलेशियाच्या गोलक्षेत्रात नेले. हॉकी स्टिकच्या नजाकतीने राज कुमारने मलेशियाच्या बचावपटूंना चकवत भारतासाठी पहिला गोल केला. तीन मिनिटांनंतर अरायजीतने कॉर्नरवरून मारलेला फटका मलेशियाच्या गोलजाळ्यात गेला. त्यामुळे भारताला २-० अशी आघाडी घेता आली. पुढच्याच मिनिटाला जुगराजने आपल्या ताकदवान ड्रॅगफ्लिकच्या जोरावर पेनल्टीकॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत पहिल्या सत्राअखेरीस भारताला ३-० असे आघाडीवर आणले.
मलेशिया मोठ्या फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत त्यांना पेनल्टीकॉर्नर मिळाला, मात्र भारताची भक्कम भिंत त्यांना भेदता आली नाही. २२व्या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टीकॉर्नर मिळाले, त्यापैकी एकावर जगातील सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर्सपैकी एक असलेल्या हरमनप्रीतने भारतासाठी चौथा गोल लगावला. एका निनिटानंतर राज कुमारने अरायजीत आणि उत्तम यांच्या सहाय्यामुळे गोल नोंदवत भारताला ५-० असे आघाडीवर आणले.
विवेक सागर प्रसादचा दमदार फटका मलेशियाच्या गोलरक्षकाने अडवल्यानंतर परत आलेल्या चेंडूवर राज कुमारने गोल करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली पहिली हॅटट्रिक लगावली. मलेशियाच्या अनाऊरने गोल करत आपल्या संघाचे खाते खोलले. मात्र त्यानंतर अरायजीतने निळकंठ शर्माच्या पासवर मैदानी गोल केला. त्यानंतर उत्तमने पेनल्टीकॉर्नरवर आणखी एक गोल करत भारताला ८-१ असा विजय मिळवून दिला.