बेधडक, सातत्यपूर्ण खेळाचे फलित! बंगळुरूच्या सलग दुसऱ्या IPL जेतेपदानंतर कर्णधार पाटीदारने उघडले यशाचे गुपित

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद काबिज केले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण, बेधडक आणि गतविजेत्यांच्या आवेशात खेळ केल्यामुळेच आम्ही हा पराक्रम करू शकलो, अशी प्रतिक्रिया बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने व्यक्त केली.
बेधडक, सातत्यपूर्ण खेळाचे फलित! बंगळुरूच्या सलग दुसऱ्या IPL जेतेपदानंतर कर्णधार पाटीदारने उघडले यशाचे गुपित
X (RCB)
Published on

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद काबिज केले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण, बेधडक आणि गतविजेत्यांच्या आवेशात खेळ केल्यामुळेच आम्ही हा पराक्रम करू शकलो, अशी प्रतिक्रिया बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने व्यक्त केली.

गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम माऱ्याला विराट कोहलीच्या (४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे बंगळुरूने गुजरात टायटन्सला ५ गडी व १२ चेंडू राखून पराभूत केले. बंगळुरूने २०२५मध्ये पंजाबला नमवून ही स्पर्धा प्रथम जिंकली होती. यंदा गुजरातला हरवून त्यांनी दुसऱ्यांदा हा खिताब पटकावला. आयपीएलमध्ये सलग दोन वेळा जेतेपद मिळवणारा बंगळुरू हा तिसरा संघ ठरला. २०१० व २०११मध्ये चेन्नईने, तर २०१९ व २०२०मध्ये मुंबईने हा पराक्रम केला होता. बंगळुरूचे हे एकंदर दुसरेच जेतेपद ठरले. गुजरातला मात्र दुसऱ्या जेतेपदाने हुलकावणी दिली. २०२२च्या विजेत्या गुजरातला २०२३ व २०२६मध्ये अंतिम फेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे महिलांची व पुरुषांच्या आयपीएलचे एकाच वर्षात जेतेपद मिळवणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे.

“संपूर्ण हंगामात आम्ही गतविजेत्यासारखा खेळ केला. संघातील प्रत्येक खेळाडूला विश्वास होता की आम्ही दुसऱ्यांदा जेतेपद मिळवू शकतो. हे यश सर्व संघाचे आणि पडद्यामागील शिल्पकारांचे आहे. प्रशिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्यामुळे हे जेतेपद आम्ही चाहत्यांनाही समर्पित करतो,” असे पाटीदार म्हणाला.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत फक्त ८ बाद १५५ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांच्यापुढे गुजरातची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार शुभमन गिल (१०), साई सुदर्शन (१२), जोस बटलर (१९) यांनी निराशा केली. त्यानंतर रसिक दरने ३ बळी मिळवले. वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंत नाबाद ५० धावांची झुंज दिली. मात्र तरीही ते आव्हान बंगळुरूपुढे कमी ठरले.

बंगळुरूकडून विराटने २५ चेंडूंतच अर्धशतक साकारले. वेंकटेश अय्यर (१६ चेंडूंत ३२), टिम डेव्हिड (१७ चेंडूंत २४) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे विकेटा जाऊनही बंगळुरूने १८ षटकांत विजय मिळवला. विराटनेच अर्शद खानला षटकार लगावून बंगळुरूच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने यंदादेखील जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ करताना साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. १४ सामन्यांतील ९ विजय व सर्वोत्तम नेटरनरेटच्या बळावर त्यांनी अग्रस्थानासह आगेकूच केली होती. मग क्वालिफायर-१मध्ये गुजरातला त्यांनी धूळ चारली. तसेच उभय संघांत आतापर्यंत ९ सामने झाले होते. त्यांपैकी बंगळुरूने ५, तर गुजरातनेदेखील ४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. रविवारी गुजरात पलटवार करेल, असे वाटत होते. मात्र बंगळुरूने बाजी मारली.

वेंकटेश, देवदत्त पडिक्कल, भुवनेश्वर, हेझलवूड, कृणाल पंड्या, पाटीदार व तारांकित विराट यांची कामगिरी बंगळुरूसाठी पूर्ण हंगामात दमदार ठरली. आता पुढील वर्षी बंगळुरूला सलग तिसरे जेतेपद खु‌णावत असेल. पहिली १७ वर्षे जेतेपदासाठी प्रतीक्षा केल्यानंतर बंगळुरूने गेल्या २ वर्षांत जेतेपद मिळवून स्वप्न पूर्ण होत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

logo
marathi.freepressjournal.in