
मुंबई : रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या त्रिकुटाने विश्रांती घेतली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत गतविजेत्या मुंबई संघाचा रणजी स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात कस लागणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर गुरुवारपासून मुंबईची मेघालयशी गाठ पडणार असून आगेकूच करण्यासाठी त्यांना ही लढत बोनस गुणासह जिंकणे गरजेचे आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ अ-गटात २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईने ६ पैकी ३ सामने जिंकले असून १ लढत अनिर्णित राहिली आहे. दोन लढतींमध्ये मुंबईचा पराभव झालेला आहे. त्यातही गेल्या सामन्यात रोहित, यशस्वी, श्रेयस यांचा समावेश असूनही मुंबईला जम्मू-काश्मीरकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे समीकरण किचकट झाले आहे.
६ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे या तिघांनीही त्यापूर्वी विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. तसेच शिवम दुबे टी-२० संघात दाखल झाल्याने तो या रणजी लढतीला मुकेल. आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी व अथर्व अंकोलेकर यांचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आहे. आता गुरुवारपासून रंगणाऱ्या लढतीत मुंबईला बोनस गुणासह विजय मिळवणे अनिवार्य आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि बडोदा यांच्यातील लढतीत एखाद्या संघाने दारुण पराभव पत्करणे मुंबईसाठी लाभदायी ठरेल.
रहाणेसह गेल्या लढतीत शतक झळकावणारा शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, सिद्धेश लाड यांच्याकडून मुंबईला चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. मेघालयचा संघ सलग ६ पराभवांसह गटात तळाशी असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
मुंबईपुढील समीकरण कसे?
अ-गटात मुंबईचा संघ २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. जम्मू-काश्मीर २९ गुणांसह पहिल्या, तर बडोदा २७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईने मेघालयाला बोनस गुणासह नमवले, तर त्यांचे २९ गुण होतील. मग जम्मूने बडोद्याला नमवले, तर मुंबई दुसऱ्या स्थानासह आगेकूच करेल. मात्र बडोद्याने जम्मूला हरवले, तर मुंबई व जम्मूचे समान २९ गुण होऊ शकतात. अशा स्थितीत धावगतीवर निकाल लागेल.
जम्मू-बडोदा लढत अनिर्णित राहिली, तर पहिल्या डावात बडोद्याने आघाडी मिळवू नये, यासाठी मुंबईला प्रार्थना करावी लागेल. कारण तसे झाले तर आघाडीचे ३ गुण बडोद्याला मिळतील व त्यांची एकूण गुणसंख्या ३० होईल.\
मेघालयविरुद्धच्या लढतीसाठी मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, अमोघ भतकल, सिद्धेश लाड, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सेलेव्हेस्टर डीसोझा, रॉयस्टन डायस, श्रेयस गुरव, अथर्व अंकोलेकर.
वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून स्थळ : बीकेसी स्टेडियम (शरद पवार क्रिकेट अकादमी, मुंबई)