रणजी क्रिकेट स्पर्धा :रहाणे शून्यावरच माघारी; श्रेयसचे अर्धशतक हुकले! आंध्र प्रदेशविरुद्ध मुंबई पहिल्या दिवसअखेर ६ बाद २८१

मुंबईने पहिल्या सामन्यात बिहारचा एका डावाने धुव्वा उडवला होता.
रणजी क्रिकेट स्पर्धा :रहाणे शून्यावरच माघारी; श्रेयसचे अर्धशतक हुकले! आंध्र प्रदेशविरुद्ध मुंबई पहिल्या दिवसअखेर ६ बाद २८१

मुंबई : शरद पवार क्रिकेट अकादमी, बीकेसी येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच पहिल्या चेंडूवर माघारी परतला, तर पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला (४८ चेंडूंत ४८ धावा) अर्धशतकाने हुलकावणी दिली.

आंध्र प्रदेशविरुद्धच्या ब-गटातील या लढतीच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने ८८ षटकांत ६ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारली आहे. दिवसअखेर शम्स मुलानी ७७ चेंडूंत ३०, तर तनुष कोटियन ७६ चेंडूंत ३१ धावांवर खेळत आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. २० वर्षीय मध्यमगती गोलंदाज नितीश रेड्डीने रहाणेसह जय बिश्ता (३९) आणि श्रेयस यांचे बळी मिळवले.

भुपेन लालवाणीने १० चौकारांसह ६१ धावांची खेळी साकारून मुंबईला सावरले. आता दुसऱ्या दिवशी शम्स व तनुष यांची जोडी मुंबईला ३५० धावांपलीकडे मजल मारून देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मुंबईने पहिल्या सामन्यात बिहारचा एका डावाने धुव्वा उडवला होता.

दुसरीकडे, अ-गटातील सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध झारखंडने पहिल्या दिवसअखेर ८९ षटकांत ५ बाद २९२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट सिंगने १०८ धावांची खेळी साकारली, तर महाराष्ट्रासाठी हितेश वाळुंजने तीन बळी मिळवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in