
नागपूर : शार्दुल ठाकूरने उपयुक्त अर्धशतकीय खेळी खेळली. परंतु डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने ५ विकेट मिळवत विदर्भला शानदार विजय मिळवून दिला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात शुक्रवारी विदर्भने गतविजेत्या मुंबईला ८० धावांनी पराभूत करत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
थरारक अशा सामन्याच्या अखेरच्या दिवशी पुण्याचा २२ वर्षीय गोलंदाज हर्ष दुबेने ३ विकेट मिळवल्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ४ विकेट घेतल्या होत्या. या पाच विकेटसह त्याने यंदाच्या हंगामात ६६ विकेट आपल्या नावे केल्या आहेत. विदर्भच्या विजयात त्याची कामगिरी मॅचविनिंग ठरली. ४०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ३२५ धावांवर सर्वबाद झाला.
विदर्भाने चौथ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
मुंबईने या सामन्यात अटीतटीची झुंज दिली. शार्दुल ठाकूरने १२४ चेंडूंत ६६ धावांची भर घातली. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणइ एका षटकाराचा समावेश होता. शार्दुल आणि शम्स मुलानी (४६ धावा) या जोडीने सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. मात्र दानिश मलेवारने धावबाद करत ही जोडी फोडली. तोच या सामन्याचा निर्णायक क्षण होता. या रन आऊटनंतर सामना विदर्भाच्या बाजूने वळला.
यश ठाकूरने शार्दुलचा त्रिफळा उडवत मुंबईला आठवा धक्का दिला. शार्दुल बाद झाला तेव्हा मुंबईचा संघ २५४ धावांवर ८ फलंदाज बाद अशा स्थितीत होता. त्यानंतर रॉयस्टॉन डायस आणि मोहित अवस्थी या जोडीने शेवटच्या विकेटसाठी ५२ धावांची भर घातली. मुंबईने ९३.४ षटकांत आपल्या खात्यात ३०० धावा झळकावल्या.
ही अखेरची सेट झालेली जोडी फोडण्यासाठी दुबे विदर्भच्या मदतीला धावून आला. त्याने अवस्थीला आपल्या सापळ्यात अडकवत विदर्भच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
केरळचा ऐतिहासिक अंतिम फेरीत प्रवेश
अहमदाबाद : गुजरातविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या डावातील २ धावांच्या आघाडीवर केरळने शुक्रवारी पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रणजी करंडक या देशांतर्गत स्पर्धेत पदार्पण केल्याच्या ६८ वर्षांनंतर केरळला प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करता आला आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी गुजरातचा संघ ४२९/७ अशा स्थितीत होता. त्यांना पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी २९ धावांची आवश्यकता होता. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने त्यांना दबावात टाकले. त्याने शेवटचे तिन्ही विकेट मिळवत गुजरातचा डाव १७४.४ षटकांत ४५५ धावांवर रोखला. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी त्यांना केवळ २ धावा कमी पडल्या. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर केरळने आगेकूच केली.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ: ३८३ आणि २९२ धावा; मुंबई : २७० आणि ३२५/१०, शार्दुल ६६, मुलानी ४६; हर्ष दुबे ५/१२७); ८० धावांनी विदर्भ विजयी.