ऋषिकेश बामणे/मुंबई
मुंबईच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत २५ वर्षीय अष्टपैलू तनुष कोटियनने मोलाचे योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंतच्या ९ सामन्यांत ४८१ धावा करतानाच २२ बळीही मिळवले आहेत. मुख्य म्हणजे तनुष ९ अथवा १०व्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. तरीही यंदाच्या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो भूपेन लालवाणीनंतर (५३३) दुसऱ्या स्थानी आहे. उपांत्यपूर्व सामन्यात शतक झळकावणाऱ्या तनुषने उपांत्य लढतीत नाबाद ८९ धावा केल्या. सर्व फलंदाज बाद झाल्याने तो शतक साकारू शकला नाही. गोलंदाजीत त्याने दोन्ही डावांत मिळून ४ फलंदाज बाद केले.
“हंगाम सुरू होण्यापूर्वी मी वैयक्तिक ५०० धावा तसेच ३० बळी मिळवण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. अंतिम फेरीत हे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न असेल. गेल्या वर्षीही मी ३८० ते ४००च्या आसपास धावा केल्या होत्या. आमच्या संघात नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतील, असे खेळाडू आहेत. त्यामुळे अनेकदा १०० ते १५० धावांत ५-६ बळी गमावल्यानंतरही आम्ही २५० ते ३०० धावा केल्या आहेत,” असे तनुष म्हणाला. संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास आपण सज्ज आहोत, असेही तनुषने नमूद केले.