सामना मुंबईचा, चर्चा श्रेयसची! बीकेसी येथे आजपासून मुंबई-तामिळनाडू यांच्यात उपांत्य फेरीचे द्वंद्व

सुलक्षण कुलकर्णी यांचा अनुभव तामिळनाडूच्या पाठीशी; दुसऱ्या उपांत्य लढतीत विदर्भ-मध्य प्रदेश येणार आमनेसामने
सामना मुंबईचा, चर्चा श्रेयसची! बीकेसी येथे आजपासून मुंबई-तामिळनाडू यांच्यात उपांत्य फेरीचे द्वंद्व
Published on

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा यंदाचा हंगाम आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बीकेसी येथे शनिवारपासून मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्य सामन्याला प्रारंभ होणार आहे. या लढतीत प्रामुख्याने श्रेयस अय्यरच्याच कामगिरीकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागून असेल. मात्र दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

२९ वर्षीय श्रेयसला काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले. तंदुरुस्त असतानाही रणजी स्पर्धेत न खेळता सावधगिरीच्या कारणास्तव विश्रांती घेण्याचा निर्णय श्रेयसला महागात पडला. मात्र करारातून वगळले असले तरी भारतीय संघात स्थान परत मिळवण्याचे दार पूर्णपणे बंद झालेले नाही. त्यामुळे पाठदुखीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांना मुकलेला श्रेयस आता मुंबईकडून रणजीच्या उपांत्य सामन्याद्वारे पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यास आतुर असेल. श्रेयस जानेवारीत आंध्र प्रदेशविरुद्ध साखळी सामन्यात खेळला होता.

४१ वेळा रणजी करंडक उंचावणाऱ्या मुंबईचे नेतृत्व अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे करणार असून या संघात श्रेयससह पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय उपांत्यपूर्व सामन्यात द्विशतक झळकावणारा युवा मुशीर खान, डावखुरा शम्स मुलानी, अष्टपैलू तनुष कोटियन, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे असे कौशल्यवान खेळाडूही मुंबईच्या ताफ्यात आहेत.

मुंबईने साखळी गटात सर्वाधिक ३७ गुण कमावून अग्रस्थानासह आगेकूच केली. मुंबईकडून मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने सर्वाधिक ३२ बळी मिळवले आहेत, तर फलंदाजीत भूपेन लालवाणीने ५१८ धावा केल्या आहेत. मात्र अष्टपैलू शिवम दुबेची अनुपस्थिती संघाला जाणवू शकते. तसेच स्पर्धेत आतापर्यंत एकच अर्धशतक साकारणाऱ्या रहाणेच्या कामगिरीची मुंबईचा चिंता असेल. उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने बडोद्यावर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात केली. २०२१-२२च्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या मुंबईला यंदा दोन वर्षांनी पुन्हा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.

-गुजरातविरुद्ध साखळी स्पर्धेत सलामीचा सामना गमावल्यानंतर तामिळनाडूचा संघ सलग सात सामन्यांत अपराजित आहे.

-तामिळनाडूप्रमाणेच मुंबईनेसुद्धा यंदाच्या हंगामात (उत्तर प्रदेशविरुद्ध) एकच लढत गमावली आहे. उर्वरित ६ लढतींपैकी ४ सामन्यांत त्यांनी बोनस गुणासह (डावाच्या फरकाने किंवा १० गडी राखून) विजय मिळवला आहे.

सुलक्षण कुलकर्णी यांचा अनुभव तामिळनाडूच्या पाठीशी

२७ वर्षीय डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोर तामिळनाडूचे नेतृत्व करत असून त्यानेच यंदाच्या हंगामात सर्वाधिक ४७ गडी बाद केले आहेत. त्यानंतर तामिळनाडूच्याच एस. अजित रामचा (४१) क्रमांक लागतो. मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळणारे तसेच प्रशिक्षक म्हणूनही यापूर्वी मुंबईला ही स्पर्धा जिंकवून देणारे सुलक्षण कुलकर्णी तामिळनाडूचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांचा अनुभव तामिळनाडूच्या खेळाडूंसाठी नक्कीच मोलाचा ठरेल.

या संघासाठी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरनेही चांगली कामगिरी केली आहे. नारायण जगदीशनने तामिळनाडूसाठी स्पर्धेत सर्वाधिक ८१२ धावा केल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर व साई सुदर्शन हे प्रतिभावान खेळाडू या लढतीसाठी संघात परतल्याने तामिळनाडूचा संघ आणखी बळकट झाला आहे. २०१६-१७ नंतर प्रथमच या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूने सौराष्ट्रला एका डावाच्या फरकाने धूळ चारली. यंदा त्यांना २०१४-१५नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. कर्णधार साई किशोरनेसुद्धा कुलकर्णी यांचे महत्त्व अधोरेखित केले असून गतविजेत्या सौराष्ट्रविरुद्ध त्यांनी एकदाच फलंदाजी करण्याचा दृष्टिकोन मांडून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला, असे मत नोंदवले.

हे माहीत आहे का?

तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी आणि मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी यापूर्वी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना रणजी जेतेपद मिळवून दिले आहे. कुलकर्णी यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबईने २०१२-१३ हंगामाचे जेतेपद मिळवले. पंडित यांनी २०१७-१८, २०१८-१९ या दोन हंगामात विदर्भाला प्रशिक्षक म्हणून जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत विदर्भ-मध्य प्रदेश येणार आमनेसामने

दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भ आणि मध्य प्रदेश हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. दोन वेळच्या विजेत्या विदर्भाने उपांत्यपूर्व लढतीत कर्नाटकवर मात केली. तर मध्य प्रदेशने रोमहर्षक लढतीत आंध्र प्रदेशवर सरशी साधली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही लढत होणार आहे.

विदर्भाकडून यंदाच्या हंगामात कर्णधार अक्षय वाडकर, सलामीवीर ध्रुव शोरे (४९६ धावा), करुण नायर (५१५ धावा), फिरकीपटू आदित्य सरवटे (३७ बळी) यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तसेच उमेश यादव, यश ठाकूर व आदित्य ठाकरे या वेगवान त्रिकुटाने सातत्याने योगदान दिले आहे. चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाखालीच २०२२मध्ये मध्य प्रदेशने रणजी स्पर्धा जिंकली होती. शुभम शर्मा मध्य प्रदेशचे नेतृत्व करत असून हिमांशू मंत्री (५१३ धावा), यश दुबे (५१०) आणि डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेय (३८ बळी) यांच्यावर संघाची प्रामुख्याने भिस्त आहे.

प्रतिस्पर्धी संघ

- मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकल, मुशीर खान, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, धवल कुलकर्णी.

- तामिळनाडू : आर. साई किशोर (कर्णधार), साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, प्रदोष पॉल, बाबा इंद्रजित, नारायण जगदीशन, सुरेश लोकेश्वर, विजय शंकर, विमल कुमार, बालसुब्रमण्यम सचिन, संदीप वॉरियर, त्रिलोक नाग, टी. नटराजन, मोहम्मद, एस. अजित राम.

logo
marathi.freepressjournal.in