
मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ९१व्या हंगामाला बुधवार, १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या पुनरागमनाकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल.
गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात होईल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा संपन्न होईल.
गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.
यंदा दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर असलेला डावखुरा फलंदाज ऋषभ पंत दिल्लीकडून खेळताना छाप पाडण्यास आतुर असेल. दिल्लीची सलामीची लढत हैदराबादशी होईल. अष्टपैलू शार्दूल ठाकूर प्रथमच रणजी स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणार असून त्यांची श्रीनगर येथे जम्मू आणि काश्मीरशी गाठ पडेल. त्याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व आकाश दीप बंगालचे प्रतिनिधित्व करणार असून बंगालसमोर सलामीला उत्तराखंडचे आव्हान असेल. महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड यांच्यावर लक्ष असेल.
या सामन्यांचे प्रक्षेपण
महाराष्ट्र वि. केरळ : स्टार स्पोर्ट्स खेल
सौराष्ट्र वि. कर्नाटक : जिओ हॉटस्टार ॲप
गुजरात वि. आसाम : जिओ हॉटस्टार ॲप
स्पर्धेची गटवारी
अ-गट : विदर्भ, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड, ओदिशा, बडोदा, नागालँड
ब-गट : महाराष्ट्र, कर्नाटक, सौराष्ट्र, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, चंदिगड, पंजाब
क-गट : गुजरात, हरयाणा, सेनादल, बंगाल, रेल्वे, त्रिपुरा, उत्तराखंड, आसाम
ड-गट : मुंबई, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, छत्तीसगड, पुद्दुचेरी
प्लेट गट : बिहार, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, मणीपूर, अरुणाचल प्रदेश (प्लेट गटातील विजेता व उपविजेता पुढील वर्षी एलिट गटात दाखल होणार.)
बंगालसाठी खेळू शकतो, तर भारतासाठी का नाही : शमी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मंगळवारी निवड समितीवर थेट निशाणा साधला. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत भारतीय संघाचा भाग असलेला शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नाही. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. “मला असे वाटते, की मी जर रणजी स्पर्धेत बंगालसाठी चार दिवसांचे सामने खेळू शकतो. तर नक्कीच भारतासाठी पाच दिवसांचा कसोटी सामनाही खेळू शकतो. माझ्या तंदुरुस्तीविषयी निवड समितीला कळवण्याचे कार्य माझे नाही. संघात निवड होणे किंवा न होणे, हे माझ्या हाती नाही. तो निर्णय सर्वस्वीपणे निवड समितीचा आहे. मात्र तंदुरुस्तीचे कारण देत मला संघाबाहेर ठेवण्यात आले असेल, तर याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही,” असे शमी म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शमी तंदुरुस्त नसल्याने त्याचा विचार करण्यात आला नाही, असे निवड समिती अध्यक्ष म्हणाले होते.