जयपूर : भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने (१७४ चेंडूंत १५६ धावा) मंगळवारी शानदार दीडशतक साकारून आगामी कसोटी मालिकेसाठी आपण तयार असल्याचे दाखवले. मात्र यशस्वीच्या शतकानंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत राजस्थानविरुद्ध फक्त एकच गुण मिळवता आला.
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेली ड-गटातील ही लढत अनिर्णित राहिली. मुंबईने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८२ षटकांत ३ बाद २६९ धावांपर्यंत मजल मारली. यशस्वीने १८ चौकार व १ षटकारासह प्रथम श्रेणी कारकीर्दीतील १७वे शतक साकारले. मुशीर खानने (६३) त्याला अर्धशतकी साथ दिली. मात्र राजस्थानने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांनी ३ गुण मिळवले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार असून त्यासाठी यशस्वीने तयार असल्याचे दाखवले.
दरम्यान, दीपक हुडाच्या द्विशतकाच्या बळावर राजस्थानने पहिला डाव ६ बाद ६१७ धावांवर घोषित केला होता. मुंबईने पहिल्या डावात २५४ धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला ३६३ धावांची आघाडी मिळाली. मग मुंबईने चौथ्या दिवशी पराभव टाळण्याच्या निर्धारानेच खेळ केला. हूडाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तूर्तास, हैदराबादचा संघ १० गुणांसह ड-गटात अग्रस्थानी आहे. त्यानंतर ३ सामन्यांतील १ विजय व २ अनिर्णित लढतींच्या १० गुणांसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान ९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईची आता ८ तारखेपासून बीकेसी येथे हिमाचल प्रदेशशी गाठ पडेल.
शार्दूल ठाकूर यंदा मुंबईचे नेतृत्व करत आहे. मुंबईने पहिल्या साखळी सामन्यात जम्मू आणि काश्मीरला नमवले. मग छत्तीसगडविरुद्ध मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळाले. या सामन्यात फलंदाज पहिल्या डावात अपयशी ठरल्याने मुंबईला एकच गुण मिळाला.
विदर्भ, महाराष्ट्राचे सामनेही अनिर्णित
दुसरीकडे महाराष्ट्र, विदर्भ यांचेही आपापल्या गटातील साखळी सामने अनिर्णित राहिले. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील पहिला डावच पावसामुळे संपला नाही. सौराष्ट्रने ५ बाद ३९४ धावांवर डाव घोषित केला. मग महाराष्ट्राने १ बाद ५५ धावा केल्या. चारही दिवस पावसाचे वर्चस्व राहिले. दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. महाराष्ट्र सध्या १० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राची आता कर्नाटकशी गाठ पडेल.
विदर्भ विरुद्ध तमिळनाडू लढतीत विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवले. तमिळनाडूला २९१ धावांत गुंडाळल्यावर यश राठोडच्या शतकामुळे विदर्भाने पहिल्या डावात ५०१ धावांचा डोंगर उभारला. मग दुसऱ्या डावात तमिळनाडूने चौथ्या दिवसअखेर ६ बाद २३३ धावा केल्या. विदर्भ अ-गटात १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची पुढील लढत ओदिशाविरुद्ध असेल.