

नवी दिल्ली : डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा, सलामीवीर के. एल. राहुल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांसारखे अनुभवी भारतीय खेळाडू यंदा रणजीच्या रणांगणात सहभागी होतील. ११ ऑक्टोबरपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे ९२वे पर्व सुरू होणार असून बीसीसीआयने मागेच जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल. २०२५-२६मध्ये जम्मू आणि काश्मीरने प्रथमच रणजी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
३७ वर्षीय जडेजा सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार असून अनुभवी जयदेव उनाडकट संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जडेजाने दोन सामन्यांत दोन गडी बाद केले. मात्र त्याला फलंदाजीची एकदाच संधी लाभली. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याला मौल्यवान लाल चेंडूच्या सामन्याचा सराव रणजी स्पर्धेद्वारे मिळेल. न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टन येथे होणार असून, दुसरी कसोटी २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान ख्राईस्टचर्च येथे खेळवली जाणार आहे.
भारताची सर्वात जुनी प्रथम श्रेणी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी स्पर्धेत राहुल कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहे. देवदत्त पडिक्कल व प्रसिध कृष्णादेखील या संघात खेळणे अपेक्षित होते. मात्र कृष्णा जायबंदी आहे, तर पडिक्कलचा भारत-अ संघात समावेश आहे. दुसरीकडे सिराज हैदराबादकडून खेळणार आहे. आयपीएलच्या हंगामास मुकलेल्या यश दयालचा आता उत्तर प्रदेश संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईच्या संघाचे नेतृत्व सिद्धेश लाड करणार असून आयुष म्हात्रे उपकर्णधार आहे.