Ranji Trophy 2026 : मुंबईची रेल्वेविरुद्ध घसरगुंडी; बिनबाद १०९ वरून दिवसअखेर ६ बाद २४७; अंक्रिश, सर्फराझची अर्धशतके

Ranji Trophy 2026 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी मुंबईने ड-गटातील चौथ्या साखळी सामन्यात रेल्वेविरुद्ध बिनबाद १०९ अशी धडाकेबाज सुरुवात केली होती.
Ranji Trophy 2026 : मुंबईची रेल्वेविरुद्ध घसरगुंडी; बिनबाद १०९ वरून दिवसअखेर ६ बाद २४७; अंक्रिश, सर्फराझची अर्धशतके
Ranji Trophy 2026 : मुंबईची रेल्वेविरुद्ध घसरगुंडी; बिनबाद १०९ वरून दिवसअखेर ६ बाद २४७; अंक्रिश, सर्फराझची अर्धशतकेPhoto - Salman Ansari
Published on: 

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी मुंबईने ड-गटातील चौथ्या साखळी सामन्यात रेल्वेविरुद्ध बिनबाद १०९ अशी धडाकेबाज सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मुंबईची फलंदाजी ढेपाळली व प्रामुख्याने अखेरच्या तासाभरात १२ धावांच्या फरकात त्यांनी ३ बळी गमावले. अंक्रिश रघुवंशी (१२२ चेंडूंत ७८ धावा) आणि सर्फराझ खान (१०० चेंडूंत ५५ धावा) यांच्या अर्धशतकांमुळे पहिल्या दिवसअखेर ८३ षटकांत ६ बाद २४७ धावांपर्यंत मजल मारली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या उभय संघांतील या लढतीत रेल्वेने जोरदार मुसंडी मारून पहिल्या दिवसावर मुंबईला पूर्ण वर्चस्व मिळवण्यापासून रोखले. पहिल्या दिवसअखेर यष्टिरक्षक आकाश आनंद (नाबाद १६), तर शम्स मुलाणी (नाबाद २) खेळपट्टीवर आहेत. आव्हानात्मक खेळपट्टीवर मुंबईला ४०० धावांपर्यंत मजल मारण्याची संधी होती. मात्र आता तळाचे फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. १७ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल.

सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणारा मुंबईचा संघ ड-गटात २१ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. मुंबईने अनुक्रमे चंदीगड व हिमाचल प्रदेशला डावाने धूळ चारली होती, तर गेल्या लढतीत हरयाणावर १० गडी राखून विजय मिळवला. रणजी स्पर्धेत एक डाव राखून अथवा १० गडी राखून विजय मिळवल्यास सहा गुणांसह अतिरिक्त १ बोनस गुण (एकूण ७ गुण) दिला जातो. आता ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई-रेल्वे यांच्यातील चौथा साखळी सामना सुरू आहे.

खेळपट्टीवर चेंडू दिवसभर स्विंग होत होता आणि गवत असूनही फिरकीला मदत मिळत होती, असे सर्फराझने सांगितले. बाहेरून खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात फलंदाजी करणे आव्हानात्मक होते, असे त्याने स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी मुंबईची उर्वरित फलंदाजी किती धावा उभारते, यावर सामन्याची दिशा ठरणार आहे.

आक्रमक सुरुवात

रेल्वेने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र अंक्रिश आणि दिव्यांश सक्सेना यांनी पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ३१.५ षटकांत १०९ धावांची शतकी सलामी नोंदवली. दिव्यांशने ९६ चेंडूंत ३९ धावा केल्या, तर गेल्या लढतीतील शतकवीर अंक्रिशने ११ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक साकारले. हिमांशू सांगवानने दिव्यांशला बाद करून ही जोडी फोडली. गेल्या सामन्यातील सामनावीर मुशीर खान ४ धावांवरच माघारी परतला. मग सांगवानने अंक्रिशलाही जाळ्यात अडकवून मुंबईची ३ बाद १२८ अशी स्थिती केली.

सिद्धेश-सर्फराझने सावरले

तेथून मग सिद्धेश व सर्फराझ यांनी मुंबईला सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. या दोघांनी संयमी फलंदाजी करत रेल्वेच्या गोलंदाजांना बराच वेळ यश मिळू दिले नाही. मात्र, अखेरच्या सत्रात रेल्वेच्या गोलंदाजांनी सलग तीन धक्के दिले. सांगवानने लाडला १२५ चेंडूंत ४७ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर आदर्श सिंहने सर्फराझला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. सर्फराझने १०० चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. ७६व्या षटकात त्याची महत्त्वपूर्ण खेळी संपुष्टात आली. त्यानंतर मोहम्मद सैफच्या गोलंदाजीवर सूर्यांश शेडगेने १ धावेवर भार्गव मेराईकडे सोपा झेल दिला. त्यामुळे मुंबईची ३ बाद २२६ वरून ६ बाद २३८ अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर आकाश व मुलाणी यांनी आणखी पडझड होऊ न देता मुंबईला २४७ धावांपर्यंत नेले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)