मुशीरच्या शतकाने मुंबईला सावरले! उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४८ धावांपर्यंत मजल

बीकेसी येथे सुरू असलेल्या या लढतीत मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
मुशीरच्या शतकाने मुंबईला सावरले! उपांत्यपूर्व सामन्यातील पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४८ धावांपर्यंत मजल

मुंबई : १८ वर्षीय मुशीर खानने (२१६ चेंडूंत नाबाद १२८ धावा) साकारलेल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिल्या शतकाने मुंबईला तारले. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ५ बाद २४८ धावांपर्यंत मजल मारली.

बीकेसी येथे सुरू असलेल्या या लढतीत मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र डावखुरा फिरकीपटू भार्गव भट्टच्या (८२ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीपुढे मुंबईची एकवेळ ५ बाद १४२ अशी स्थिती होती. पृथ्वी शॉ (३३), भूपेन लालवाणी (१९) यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नाही. रहाणेने (३) पुन्हा निराशा केली, तर शम्स मुलानी (६) व सूर्यांश शेडगेही (२०) अपयशी ठरले.

मग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मुशीरने यष्टिरक्षक हार्दिक तामोरेच्या साथीने डोलारा सावरला. काही दिवसांपूर्वीच १९ वर्षांखालील विश्वचषकात मुशीरने दोन शतके झळकावली होती. मुशीर व हार्दिकने सहाव्या विकेटसाठी १०६ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. मुशीरने १० चौकारांसह चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात पहिले शतक झळकावले असून दिवसअखेर तो १२८ धावांवर नाबाद आहे, तर हार्दिक १६३ चेंडूंत ३० धावांवर खेळत आहे. त्यामुळे शनिवारी दुसऱ्या दिवशी यांच्यासह शार्दूल ठाकूर मुंबईला कितपत मजल मारून देणार, हे पाहणे रंजक ठरेल.

मनोहर जोशी यांना आदरांजली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना मुंबईच्या खेळाडूंनी सामना सुरू होण्यापूर्वी दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली. तसेच दंडाला काळ्या रंगाची फितही बांधली.

श्रेयसवर कारवाईची शक्यता

श्रेयस अय्यरने पाठदुखीचे कारण देत रणजी स्पर्धेतील उपांत्य सामन्यांतून माघार घेतली होती. मुंबई-बडोदा यांच्यात सध्या उपांत्यपूर्व सामना सुरू आहे. मात्र एनसीएने बीसीसीआयला दिलेल्या माहितीनुसार श्रेयस दुखापतग्रस्त नाही. एनसीएचे वैद्यकीय प्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआय तसेच राष्ट्रीय निवड समितीला श्रेयस तंदुरुस्त असल्याचे कळवले आहे. त्यामुळे आता श्रेयसने नेमका कोणत्या हेतूने रणजी सामन्यातून माघार घेतली, हे अनाकलनीय आहे. अशा स्थितीत बीसीसीआय त्याच्यारव कारवाई करण्याची शक्यता असून त्याला कदाचित वार्षिक कराराच्या यादीतूनही वगळण्यात येऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in