दानिशचा शतकी डंका; पहिल्या दिवसअखेर विदर्भ ४ बाद २५४

२१ वर्षीय युवा फलंदाज दानिश मलेवारने (२५९ चेंडूंत नाबाद १३८ धावा) बुधवारी प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले.
दानिशचा शतकी डंका; पहिल्या दिवसअखेर विदर्भ ४ बाद २५४
एक्स @BCCIdomestic
Published on

नागपूर : २१ वर्षीय युवा फलंदाज दानिश मलेवारने (२५९ चेंडूंत नाबाद १३८ धावा) बुधवारी प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. त्याला करुण नायरच्या (१८८ चेंडूंत ८६ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात केरळविरुद्ध विदर्भाने दमदार सुरुवात केली.

नागपूर, जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवसअखेर विदर्भाने ८६ षटकांत ४ बाद २५४ धावा केल्या आहेत. दानिश १३८, तर नाइटवॉचमन म्हणून आलेला यश ठाकूर ५ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे आता गुरुवारी विदर्भाचे फलंदाज किती मोठी धावसंख्या रचणार, हे पाहणे रंजक ठरेल.

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रणजी स्पर्धेचा ९०वा हंगाम आता अंतिम लढतीच्या टप्प्यात आहे. एकीकडे विदर्भाला तिसऱ्यांदा, तर केरळला प्रथमच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने उपांत्य फेरीत मुंबईला धूळ चारून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीची कसर भरून काढत घरच्या मैदानात जेतेपद मिळवण्याचे विदर्भाचे लक्ष्य असेल. विदर्भाने यापूर्वी २०१७-१८, २०१८-१९ या हंगामांत रणजी स्पर्धा जिंकली होती. दुसरीकडे केरळने उपांत्य फेरीत गुजरातला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर नमवून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित असल्याने विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून विदर्भाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर विदर्भाने अनोखी चाल रचली. त्यांनी ध्रुव शोरेसह पार्थ रेखाडे या गोलंदाजाला सलामीला पाठवले. पार्थ (०) पहिल्याच षटकात बाद झाल्यावर त्यांनी वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेला (१) तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. मात्र हा प्रयोगही फसला. ध्रुवसुद्धा (१६) छाप पाडू शकला नाही.

३ बाद २४ अशी स्थिती असाताना मग दानिश व करुणची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी रचली. अनुभवी करुणने हंगामातील दुसरे अर्धशतक साकारले. तर दानिशने १४ चौकार व २ षटकारांसह शतक झळकावले. करुण दुर्दैवीरीत्या धावचीत झाला. मात्र दानिशने दिवसअखेरपर्यंत नाबाद राहून विदर्भाला अडीचशे धावांपलीकडे मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : ८६ षटकांत ४ बाद २५४ (दानिश मलेवार नाबाद १३८, करुण नायर ८६; एमडी निधीश २/३३)

logo
marathi.freepressjournal.in