रणजी स्पर्धा; अनिर्णित सामन्यात कर्णधार रहाणेला सूर गवसला, छत्तीसगढविरुद्ध मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण

कर्णधार अजिंक्य रहाणेने (१२४ चेंडूंत नाबाद ५६ धावा) अखेर यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. मात्र मुंबई विरुद्ध छत्तीसगढ यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा साखळी सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला.
रणजी स्पर्धा; अनिर्णित सामन्यात कर्णधार रहाणेला सूर गवसला, छत्तीसगढविरुद्ध मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण

रायपूर : कर्णधार अजिंक्य रहाणेने (१२४ चेंडूंत नाबाद ५६ धावा) अखेर यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. मात्र मुंबई विरुद्ध छत्तीसगढ यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा साखळी सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला. मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर ३ गुण मिळवून गटातील अग्रस्थान कायम राखले.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झालेल्या ब-गटातील या सामन्यात मुंबईने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८२ षटकांत ६ बाद २५३ धावा केल्या. पहिल्या डावातील शतकवीर भूपेन लालवाणीने दुसऱ्या डावात ५९ धावा केल्या. पृथ्वी शॉला (४५) अर्धशतकाने हुलकावणी दिली. हंगामातील चौथा सामना खेळणाऱ्या रहाणेने मात्र ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या. रहाणेने यापूर्वीच्या सहा डावांत अनुक्रमे ०, ०, १६, ८, ९, १ अशा धावा केल्या होत्या. शार्दूल ठाकूरने ३१ धावा फटकावल्या.

मुंबईने पहिल्या डावात पृथ्वी व भूपेनच्या शतकामुळे ३५१ धावा केल्या. त्यानंतर तुषार देशपांडेने ५ बळी पटकावल्याने मुंबईने छत्तीसगढला ३५० धावांत रोखत एका धावेची आघाडी मिळवली. हीच आघाडी त्यांना ३ गुणांसाठी निर्णायक ठरली. छत्तीसगढकडून पहिल्या डावात १४३ धावांची खेळी साकारणारा कर्णधार अमनदीप खरे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सध्या मुंबईच्या खात्यात ६ सामन्यांनंतर (४ विजय, १ पराभव, १ अनिर्णित) एकूण ३० गुण जमा आहेत. मुंबईची आता १६ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या अंतिम व सातव्या साखळी सामन्यात आसामशी गाठ पडेल.

५६*

अजिंक्य रहाणे

१२४ चेंडू

६ चौकार

१ षटकार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in