मुलाणीमुळे मुंबईला पहिल्या डावात आघाडी

बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बडोद्याने शनिवारच्या २ बाद १२७ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला.
मुलाणीमुळे मुंबईला पहिल्या डावात आघाडी

मुंबई : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने (१२१ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या डावात निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा केल्या असून त्यांच्याकडे एकूण ५७ धावांची आघाडी आहे.

बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बडोद्याने शनिवारच्या २ बाद १२७ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. शाश्वत रावत (१९४ चेंडूंत १२४ धावा), कर्णधार विष्णू सोलंकी (२९१ चेंडूंत १३६) या दोघांनी झुंजार शतके झळकावली. तसेच तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १७४ धावांची भागीदारी रचली. मात्र तुषार देशपांडेने या दोन्ही शतकवीरांना बाद केले. त्यानंतर मुलाणीने मधल्या व तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत बडोद्याचा पहिला डाव ११०.३ षटकांत ३४८ धावांत गुंडाळला. मुंबईने पहिल्या डावात मुशीर खानच्या द्विशतकामुळे ३८४ धावा केल्या होत्या. मग दुसऱ्या डावात मुंबईने भूपेन लालवाणीला (६) लवकर गमावले. मात्र हार्दिक तामोरे (१२) व नाइट-वॉचमन मोहित अवस्थी (३) यांनी उर्वरित षटके खेळून काढली. या लढतीचे अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने मुंबई पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर आगेकूच करू शकते.

विदर्भ तब्बल २२४ धावांनी आघाडीवर

वेगवान गोलंदाज यश ठाकूर (४८ धावांत ३ बळी) आणि डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे (५० धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे विदर्भाने उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकचा पहिला डाव २८६ धावांत गुंडाळला. निकीन जोस (८२) व रवीकुमार समर्थने (५९) त्यांच्याकडून अर्धशतकी झुंज दिली. विदर्भाने पहिल्या डावात ४६० धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना १७४ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात बिनबाद ५० धावांपर्यंत मजल मारून एकूण आघाडी २२४ पर्यंत वाढवली. अथर्व तायडे २१, तर ध्रुव शोरे २९ धावांवर खेळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in