रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुलानीमुळे मुंबई विजयासमीप

ब-गटातील या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने दुसऱ्या डावात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुलानीमुळे मुंबई विजयासमीप
Published on

मुंबई : मुंबईचा अनुभवी डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने पहिल्या डावात ६ व दुसऱ्या डावात ३ बळी मिळवून आंध्र प्रदेशची कोंडी केली आहे. त्यामुळे शरद पवार क्रिकेट अकादमी, बीकेसी येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईने विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे.

ब-गटातील या लढतीत तिसऱ्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने दुसऱ्या डावात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. आंध्र प्रदेशचा संघ अद्याप ४७ धावांनी पिछाडीवर असून शेख रशीद ५२, तर नितीश कुमार रेड्डी २२ धावांवर खेळत आहे. मुंबईने पहिल्या डावात ३९५ धावा उभारल्यानंतर आंध्र प्रदेशचा पहिला डाव ७२ षटकांत १८४ धावांवरच आटोपला. त्यामुळे मुंबईने त्यांच्यावर फॉलोऑन लादला असून सोमवारी अखेरच्या दिवशी आंध्र प्रदेश मुंबईला विजयापासून वंचित ठेवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

शनिवारच्या ३ बाद ९८ धावांवरून पुढे खेळताना मुलानीने हनुमा विहारी (६), कर्णधार रिकी भूई (२०), शेख रशीद (३) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले, तर धवल कुलकर्णीने अर्धशतक झळकावणाऱ्या प्रशांत कुमारचा (७३) अडथळा दूर केला. त्याने तीन बळी पटकावून मुलानीला उत्तम साथ दिली.

logo
marathi.freepressjournal.in