
मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. ८ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या उपांत्यपूर्व लढतींमध्ये गतविजेत्या मुंबईची गाठ हरयाणाशी पडणार आहे. रोहतक येथे ही लढत खेळवण्यात येईल.
पहिली उपांत्यपूर्व लढत अ-गटातील विजेते म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि क-गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ केरळ यांच्यात पुणे येथे होईल. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात नागपूर येथे विदर्भ आणि तमिळनाडू आमनेसामने येतील. तिसरी उपांत्यपूर्व लढत ही मुंबई आणि हरयाणा यांच्यात रंगेल. चौथ्या सामन्यात राजकोट येथे सौराष्ट्र आणि गुजरात आमनेसामने येतील. उपांत्य व अंतिम फेरी कुठे होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. २०२४मध्ये मुंबईने रणजी ट्रॉफीचे जेतेपद मिळवले होते. त्यावेळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विदर्भाविरुद्ध अंतिम सामना झाला होता.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने शेवटच्या लढतीत मेघालयवर बोनस गुणासह विजय मिळवून आगेकूच केली. बडोद्याला मात्र जम्मूकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
उपांत्यपूर्व फेरी (८ ते ११ फेब्रुवारी)
जम्मू-काश्मीर वि. केरळ (पुणे)
विदर्भ वि. तमिळनाडू (नागपूर)
मुंबई वि. हरयाणा (रोहतक)
सौराष्ट्र वि. गुजरात (राजकोट)
सेनादलच्या शुभम, सुरज यांचा विश्वविक्रम
रणजी स्पर्धेच्या अ-गटात सेनादल विरुद्ध ओदिशा यांच्यातील अखेरच्या साखळी लढतीत अनोखा विक्रम रचला गेला. सेनादलच्या शुभम रोहिल्ला (२७० चेंडूंत नाबाद २०९ धावा) आणि सुरज वशिष्ठ (२४६ चेंडूंत नाबाद १५४ धावा) या दोघांनी तब्बल ३७६ धावांची सलामी नोंदवून संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रथमच एखाद्या संघाने एकही विकेट न गमावता ३७६ इतक्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
या दोन्ही संघांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. मात्र लढतीचा विचार करता पहिल्या डावात ओदिशा १८० धावांत गारद झाल्यावर सेनादलने १९९ धावा करत फक्त १९ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर ओदिशाने दुसऱ्या डावात ३९४ धावा करत सेनादलपुढे ३७६ धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसअखेर सेनादलने बिनबाद ४६ धावा केल्या होत्या. मग चौथ्या दिवशी शुभम व सूरजच्या जोडीने उर्वरित ३३० धावा केल्या.