रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा; मुंबईकडे २१३ धावांची आघाडी, बंगालच्या अनुस्तुप मजुमदारचे शतक

तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर आणि रॉयस्टन डायस या गोलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने बंगालविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात सर्वबाद ४१२ धावा उभारल्या.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा; मुंबईकडे २१३ धावांची आघाडी, बंगालच्या अनुस्तुप मजुमदारचे शतक

कोलकाता : तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर आणि रॉयस्टन डायस या गोलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने बंगालविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात सर्वबाद ४१२ धावा उभारल्या. त्यानंतर मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस आणि शिवम दुबे यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे मुंबईने यजमान बंगालचा पहिला डाव १९९ धावांवर संपुष्टात आणत दुसऱ्या दिवसअखेर २१३ धावांची आघाडी घेतली आहे.

पहिल्या दिवशी शिवम दुबे (७२) आणि सूर्यांश शेडगे (७१) यांनी मुंबईच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी तनुष कोटियन आणि अंकोलेकर यांनी मुंबईला सुस्थितीत आणून ठेवले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. मोहम्मद कैफच्या गोलंदाजीवर अंकोलेकर ४६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मोहित अवस्थीला (०) खातेही खोलता आले नाही. त्यामुळे तनुषने धवल कुलकर्णीसह किल्ला लढवला. मात्र कोटियनची खेळी सूरज सिंधू जैस्वाल याने संपुष्टात आणली. तनुषने ९८ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा फटकवल्या. ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या डायस याने ४३ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराची आतषबाजी करत नाबाद ४६ धावा तडकावल्या. त्यामुळेच मुंबईला ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला. बंगालकडून जैस्वालने ६ बळी मिळवले.

बंगालला मात्र अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने बंगालची अवस्था ३ बाद ११ अशी बिकट केली असताना अनुस्तुप मजुमदारने एका बाजूने किल्ला लढवला. त्याला कर्णधार मनोज तिवारीची चांगली साथ लाभली. या दोघांनी ७८ धावांची मोलाची भागीदारी रचली. मात्र तिवारी (३६) बाद झाल्यावर बंगालच्या डावाला उतरती कळा लागली. अनुस्तुप १०८ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या १२७ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. मुंबईकडून अवस्थीने ३ बळी टिपले.

logo
marathi.freepressjournal.in