उपांत्यपूर्व फेरीचे द्वंद्व सुरू: मुंबईसमोर बडोद्याचे आव्हान; पृथ्वीच्या कामगिरीकडे नजरा

या फेरीतील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईची बडोद्याशी गाठ पडेल.
उपांत्यपूर्व फेरीचे द्वंद्व सुरू: मुंबईसमोर बडोद्याचे आव्हान; पृथ्वीच्या कामगिरीकडे नजरा

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. या फेरीतील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईची बडोद्याशी गाठ पडेल. मुंबईतील बीकेसी मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार असून प्रामुख्याने सलामीवीर पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

श्रेयस अय्यर, शिवम दुबे यांसारखे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे या लढतीसाठी अनुपलब्ध असतील. तसेच यशस्वी व सर्फराझ हे दोन मुंबईचे फलंदाज सध्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तरीही आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या पृथ्वी, रहाणे व शार्दूल ठाकूर यांच्याकडून मुंबईला चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. ४१ वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने युवा मुशीर खानलासुद्धा संधी दिली आहे. मोहित अवस्थी व शम्स मुलानी यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त असेल. मुंबईने ब-गटात सातपैकी पाच सामने जिंकून सर्वाधिक ३७ गुणांसह आगेकूच केली होती. भूपेन लालवाणीने मुंबईसाठी या हंगामात सर्वाधिक ४९३ धावा केल्या आहेत. तर मोहितने ६ सामन्यांत सर्वाधिक ३१ बळी मिळवले आहेत.

मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकल, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने

विदर्भ वि. कर्नाटक (स्थळ : नागपूर)

मुंबई वि. बडोदा (स्थळ : मुंबई)

तामिळनाडू वि. सौराष्ट्र (स्थळ : चेन्नई)

मध्य प्रदेश वि. आंध्र प्रदेश (स्थळ : इंदूर)

वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in