रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत

आदित्य सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात एकूण ५ बळी मिळवण्यासह पहिल्या डावात ९९, तर दुसऱ्या डावात ४२ धावांचे योगदानही दिले.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत
Published on

नागपूर : अक्षय वाखरे (३० धावांत ३ बळी) आणि आदित्य सरवटे (३८ धावांत २ बळी) या फिरकीपटूंच्या जोडीने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात हरयाणाला ११५ धावांनी धूळ चारली. या विजयासह विदर्भाने अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या लढतीत विदर्भाने दिलेल्या २९६ धावांचा पाठलाग करताना हरयाणाचा दुसरा डाव अखेरच्या दिवशी ३४.३ षटकांतच १८० धावांत आटोपला. अनुभवी उमेश यादवने दोन, तर आदित्य ठाकरे व यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी टिपून उत्तम कामगिरी केली. विदर्भाने रविवारच्या ४ बाद ११३ धावांवरून पुढे खेळताना त्यांचा दुसरा डाव २०५ धावांत संपुष्टात आला होता. मात्र पहिल्या डावातील ९० धावांच्या आघाडीमुळे त्यांनी हरयाणापुढे २९६ धावांचे लक्ष्य ठेवले. हरयाणाकडून अंशुल कंबोजने २५ चेंडूंत ४६ धावांची झुंज दिली.

आदित्य सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात एकूण ५ बळी मिळवण्यासह पहिल्या डावात ९९, तर दुसऱ्या डावात ४२ धावांचे योगदानही दिले. तसेच कर्णधार अक्षय वाडकरनेही छाप पाडली. विदर्भाने अ-गटात सात सामन्यांतील पाच विजय व एका बरोबरीचे सर्वाधिक ३३ गुण कमावले. सौराष्ट्रने २९ गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

दरम्यान, ब-गटातून मुंबई, आंध्र प्रदेश यांनी आगेकूच केली. मुंबईने सर्वाधिक ३७ गुण कमावले. क-गटातून तामिळनाडू, कर्नाटक यांनी, ड-गटातून मध्य प्रदेश, बडोदा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रणजी प्लेट गटातील अंतिम सामन्यात हैदराबाद आणि मेघालय एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या लढतीतील विजेता पुढील वर्षी मुख्य गटांसाठी पात्र होईल, तर चार मुख्य गटांत शेवटच्या स्थानी राहिलेल्या संघांपैकी एखादा संघ प्लेट गटात ढकलला जाईल. हैदराबादला विजयासाठी आणखी १२७ धावांची गरज असून त्यांचे ९ फलंदाज शिल्लक आहेत. त्यामुळे ते मंगळवारी विजय मिळवण्याची दाट शक्यता आहे.

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

विदर्भ वि. कर्नाटक (स्थळ : नागपूर)

मुंबई वि. बडोदा (स्थळ : मुंबई)

तामिळनाडू वि. सौराष्ट्र (स्थळ : चेन्नई)

मध्य प्रदेश वि. आंध्र प्रदेश (स्थळ : इंदूर)

(सर्व सामने २३ फेब्रुवारीपासून सकाळी ९.३० वाजता सुरू होतील.)

logo
marathi.freepressjournal.in