
नागपूर : स्पर्धेत अपराजित असलेला विदर्भ आणि प्रथमच अंतिम फेरीत धडक मारणारा केरळ या संघांमध्ये बुधवारपासून रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे. नागपूर, जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही लढत होईल.
अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने उपांत्य फेरीत मुंबईला धूळ चारून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीची कसर भरून काढत घरच्या मैदानात जेतेपद मिळवण्याचे विदर्भाचे लक्ष्य असेल. विदर्भाने यापूर्वी २०१७-१८, २०१८-१९ या हंगामांत रणजी स्पर्धा जिंकली होती. यंदा यश राठोडने विदर्भासाठी सर्वाधिक ९३३ धावा केल्या असून यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे. तसेच हर्ष दुबेने स्पर्धेत सर्वाधिक ६६ बळी मिळवले आहेत. विदर्भाने या स्पर्धेत आतापर्यंत ९ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे विदर्भाला रोखणे कठीण असेल. करुण नायर, अक्षय वाखरे, यश राठोड, हर्ष दुबे असे प्रतिभावान खेळाडू विदर्भाकडे आहेत. विजय हजारे स्पर्धेतही विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दुसरीकडे सचिन बेबीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केरळने उपांत्य लढतीत गुजरातवर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात केली. केरळसुद्धा या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी ९ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले. ज्यामध्ये केरळने पहिल्या डावात आघाडी मिळवली. जलज सक्सेनाने केरळसाठी सर्वाधिक ३८ बळी मिळवले आहेत. फलंदाजीत सलमान निझारने केरळसाठी सर्वाधिक ६०७ धावा केल्या आहेत.
३८ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. मुंबईने गतवर्षी रणजीचे जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विदर्भ व केरळ यांच्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या सामन्यानंतर देशांतर्गत स्पर्धांचा हंगाम संपणार आहे. यंदा तारांकित खेळाडूही रणजी स्पर्धेत सहभागी झाले होते.
विदर्भाला तिसऱ्यांदा रणजीचे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. त्यांनी २०१८, २०१९मध्ये लागोपाठच्या हंगामांत ही कामगिरी केली आहे, तर केरळला पहिले रणजी जेतेपद खुणावत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
gकेरळ : सचिन बेबी (कर्णधार), रोहन कुन्नुमल, सलमान निझार, मोहम्मद अझरुद्दीन, अक्षय चंद्रन, जलज सक्सेना, शॉन रॉजर, आदित्य सरवटे, बसिल थम्पी, निधीश, शराफुद्दीन, आनंद कृष्णन, वरुण नयनार, एडन टॉम, अहमद इम्रान, श्रीहरी नायर, नेदुमंझ बसिल.
विदर्भ : अक्षय वाडकर (कर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वाखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुटे, सिद्धेश वाठ, यश ठाकूर, दानिश मलेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओस्टार ॲप आणि बीसीसीआय डॉमेस्टिक संकेतस्थळ.