Ranji Trophy Final : मुशीरच्या शतकामुळे मुंबईची मक्तेदारी! विदर्भापुढे विजयासाठी ५३८ धावांचे लक्ष्य

दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने वानखेडेच्या रणभूमीवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईचीच मक्तेदारी दिसून येत आहे.
Ranji Trophy Final : मुशीरच्या शतकामुळे मुंबईची मक्तेदारी! विदर्भापुढे विजयासाठी ५३८ धावांचे लक्ष्य

ऋषिकेश बामणे/मुंबई

दर्दी क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने वानखेडेच्या रणभूमीवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईचीच मक्तेदारी दिसून येत आहे. १९ वर्षीय युवा फलंदाज मुशीर खानने (३२६ चेंडूंत १३६ धावा) साकारलेल्या झुंजार शतकाला श्रेयस अय्यर (१११ चेंडूंत ९५) आणि शम्स मुलाणी (८५ चेंडूंत नाबाद ५०) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने विदर्भापुढे विजयासाठी तब्बल ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

तब्बल ४८व्यांदा रणजीच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या मुंबईचा दुसरा डाव मंगळवारी तिसऱ्या दिवशी १३०.२ षटकांत ४१८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर २ षटकांत बिनबाद १० धावा केल्या आहेत. अथर्व तायडे ३, तर ध्रुव शोरे ७ धावांवर खेळत आहे. विदर्भाला विजयासाठी आणखी ५२८ धावांची आवश्यकता असली तरी वानखेडेच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात इतक्या धावांचा पाठलाग करणे जवळपास अशक्यच दिसते. त्यामुळे ओमकार साळवी यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणारा मुंबईचा संघ बुधवारीच ४२व्या जेतेपदाला गवसणी घालणार की विदर्भाचे फलंदाज प्रतिकार करून हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबवणार, हे पाहणे खरंच रंजक ठरणार आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या वानखेडेवर सुरू असलेल्या या लढतीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने २ बाद १४१ धावांपर्यंत मजल मारून २६० धावांची आघाडी घेतली होती. तेथून पुढे मंगळवारी तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना कर्णधार अजिंक्य रहाणे व १९ वर्षांखालील विश्वचषकात चमकलेला मुशीर यांनी सावध सुरुवात केली. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने रहाणेला बाद करून ही जोडी फोडली. रहाणेने ५ चौकार व १ षटकारासह १४३ चेंडूंत ७३ धावा करतानाच मुशीरसह तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचली.

यानंतर मैदानावर श्रेयसचे आगमन झाले. सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या श्रेयसला पहिल्या डावातील अपयश बाजूला सारून स्वत:ला सिद्ध करण्याची ही संधी होती. त्याने या संधीचा पूरेपूर लाभ उचलताना पहिल्या २० चेंडूंतच २ चौकार व १ षटकार लगावला. मग ६१ चेंडूंत त्याने अर्धशतक साकारून उपहारापर्यंत मुंबईला ३ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसऱ्या सत्रात मग मुशीर व श्रेयस यांनी धावगतीचा वेग वाढवला. एकवेळ श्रेयस मुशीरच्या आधी शतक साकारेल, असे वाटू लागले. मात्र मुशीरने यात बाजी मारताना वैयक्तिक २५५व्या चेंडूवर शतकाची वेस ओलांडली. त्याचे हे यंदाच्या हंगामातील तसेच प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले. शतकानंतर आनंद साजरा करताना तो काहीसा भावुक झालेला दिसला.

श्रेयसही लवकरच शतक झळकावणार असे वाटत असताना आदित्य ठाकरेच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून तो ९५ धावांवर बाद झाला. श्रेयसने १० चौकार व ३ षटकार लगावतानाच चौथ्या विकेटसाठी मुशीरसह १६८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर हार्दिक तामोरे (५) छाप पाडू शकला नाही. मग चहापानापूर्वीच्या अखेरच्या षटकात दुबेने धोकादायक मुशीरला पायचीत पकडून मुंबईला सहावा धक्का दिला. मुशीरने १० चौकारांसह १३६ धावा करतानाच तब्बल सात तास खेळपट्टीवर ठाण मांडले होते.

तिसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर दुबेने शार्दूल ठाकूरचा शून्यावर त्रिफळा उडवला. तनुष कोटियनला (१३) बाद करून दुबेने बळींचे पंचक पूर्ण केले. मात्र अष्टपैलू मुलाणीने संघाला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. त्याने ६ चौकारांसह नाबाद ५० धावा करतानाच यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक साकारले. अखेर यश ठाकूरने धवल कुलकर्णीला बाद करून मुंबईचा दुसरा डाव १३०.२ षटकांत ४१८ धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात मुंबईने ११९ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे विदर्भापुढे एकंदर ५३८ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटे जायबंदी झाल्याने तो तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करू शकला नाही. त्याची अनुपस्थिती विदर्भाला प्रकर्षाने जाणवली.

रोहित, सचिन यांची उपस्थिती

रणजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे तसेच भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वानखेडेवर उपस्थित होते. रोहित ड्रेसिंग रूममध्ये शार्दूल, धवल यांच्याशी संवाद साधताना दिसला. याव्यतिरिक्त, माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, सुब्रतो बॅनर्जी, मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही एमसीए प्रेसिडंट बॉक्समध्ये हजेरी लावली होती. सोमवारी सुनील गावसकर, डायना एडल्जी या माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा रणजीच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटला होता.

५,००० चाहत्यांनी गाठले वानखेडे

मोफत प्रवेश असल्याने मंगळवारी जवळपास ५ हजार चाहत्यांनी रणजीच्या अंतिम सामन्यासाठी वानखेडे गाठले. पहिल्या दिवशीही इतकाच आकडा होता. दुसऱ्या दिवशी यामध्ये काहीशी घसरण झाली होती. आता बुधवारी लढतीचा अखेरचा दिवस ठरण्याची शक्यता असल्याने आणखी किती चाहते स्टेडियम गाठणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संक्षिप्त धावफलक

- मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद २२४

- विदर्भ (पहिला डाव) : सर्व बाद १०५

- मुंबई (दुसरा डाव) : १३०.२ षटकांत सर्व बाद ४१८ (मुशीर खान १३६, श्रेयस अय्यर ९५, अजिंक्य रहाणे ७३; हर्ष दुबे ५/१४४)

- विदर्भ (दुसरा डाव) : २ षटकांत बिनबाद १० (ध्रुव शोरे नाबाद ७, अथर्व तायडे नाबाद ३)

logo
marathi.freepressjournal.in