
कोलकाता : प्रमुख फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर अडचणीत सापडलेल्या मुंबईसाठी शम्स मुलानी आणि तनुष कोटीयन ही जोडगोळी संकटमोचन ठरली. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी हरयाणाविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ११३ धावांवर ७ बाद अशा संकटात सापडलेल्या मुंबईचा डाव दिवसाअखेर २७८ धावांवर ८ फलंदाज बाद असा सावरला. हरयाणाच्या अंशुल कंबोजने शानदार गोलंदाजी केली.
नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईच्या संघाची घसरगुंडी झाली. माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे (३१ धावा), टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव (९ धावा), अष्टपैलू शिवम दुबे (२८ धावा) हे स्टार फलंदाज स्वस्तात माघारी परतले.
हरयाणाच्या अंशुल कंबोजने (१८ षटकांत ३/५८) मुंबईला धक्के दिले. मात्र खेळपट्टीवरचा ओलावा जसजसा ओसरला तशी ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल झाली. शम्स मुलानी (१७८ चेंडूंत ९१ धावा) आणि तनुष कोटीयन (१५४ चेंडूंत नाबाद ८५ धावा) यांनी खराब चेंडूंचा फायदा घेतला. कंबोज, सुमित कुमार (२/५७), अनुज ठकराल (१/५९) आणि अजित चहल (१/२१) यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना सतावले.