

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी मुंबईने रोमहर्षक विजय मिळवताना रेल्वेवर १०६ धावांनी वर्चस्व गाजवले. सामना संपायला अवघ्या तासाभराचा अवधी शिल्लक असताना मुंबईने रेल्वेचे अखेरचे पाच फलंदाज बाद केले. याबरोबरच मुंबईने सलग विजयी चौकार लगावताना ड-गटात अग्रस्थान कायम राखून उपांत्यपूर्व फेरीत एक पाऊल टाकले.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या लढतीत सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने दिव्यांश सक्सेनाच्या (१३६ चेंडूंत नाबाद १०० धावा) शतकाच्या बळावर दुसरा डाव ४ बाद २३४ धावांवर घोषित केला. त्यामुळे मुंबईने विजयासाठी रेल्वेपुढे ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले. रेल्वेचा दुसरा डाव मात्र ७७.२ षटकांत २६५ धावांत आटोपला. एकवेळ ते ५ बाद २५० अशा सुस्थितीत होते. इशान गोयल (१०३) व झुबैर अली (११५) यांनी झुंजार शतके साकारली. मात्र मुशीर खान (४२ धावांत ३ बळी) व तनुष कोटियन (९३ धावांत २ बळी) यांनी अखेरच्या तासाभरात शतकवीरांसह उर्वरित बळी मिळवले. त्यामुळे मुंबईने थरारक विजय नोंदवला व ६ गुण मिळवले. आता थेट जानेवारीत दुसऱ्या टप्प्यात मुंबईचा संघ पुढील साखळी सामने खेळणार आहे.
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडला. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळला. दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल.
तत्पूर्वी, सामन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईने आघाडीत आणखी ६० धावांची भर घालत रेल्वेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रात्री नाबाद राहिलेला सक्सेना याने १३६ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०० धावा केल्या. रेल्वेने झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
रेल्वेकडून सलामीवीर ईशान गोयलने १०३ धावांची, तर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अलीने ११५ धावांची शानदार शतकी खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तब्बल २१२ चेंडूंचा सामना करत त्यांनी १५६ मिनिटे मुंबईच्या गोलंदाजांना यशापासून दूर ठेवले. मात्र, अखेरच्या तासात मुंबईच्या खेळाडूंनी रेल्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
सर्फराझचा अफलातून झेल
सामन्याचा निर्णायक क्षण सर्फराझ खानच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे आला. यापूर्वी एक झेल सोडलेला आणि एक धावबाद केलेला सर्फराझ याने पहिल्या स्लिपमधून लेग स्लिपच्या दिशेने वेगाने धाव घेत झेपावत गोयलचा झेल टिपला. मुशीर खानच्या (३/४२) गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात गोयलच्या बॅटला लागून चेंडू हवेत उडाला आणि सर्फराझने संधीचे सोने केले. या झेलमुळे गोयल आणि झुबेर यांची भागीदारी संपुष्टात आली.
अखेरच्या तासात पलटवार
त्यानंतर सूर्यांश शेडगेने मिड-ऑफवरून डावीकडे धावत अलीचा झेल टिपला. तनुष कोटियननेही शॉर्ट मिडविकेटवर आठव्या विकेटसाठी एकहाती अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे ५ बाद २५० वरून रेल्वेची गाडी रुळावरून घसरली.
२७ गुणांसह अग्रस्थानी
सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईचे आता ४ सामन्यांत २७ गुण आहेत. यांमध्ये तीन विजय बोनस गुणासह आहेत. मुंबईने अनुक्रमे चंदीगड व हिमाचल प्रदेशला डावाने धूळ चारली होती, तर गेल्या लढतीत हरयाणावर १० गडी राखून विजय मिळवला. रणजी स्पर्धेत एक डाव राखून अथवा १० गडी राखून विजय मिळवल्यास सहा गुणांसह अतिरिक्त १ बोनस गुण (एकूण ७ गुण) दिला जातो. आता रेल्वेला नमवल्याने मुंबईने सहा गुणांची कमाई केली.