रणजी ट्रॉफी: शार्दूलच्या शतकाचा तामिळनाडूला तडाखा; उपांत्य लढतीत मुंबईचा संघ पोहोचला सुस्थितीत

क्रीडा विश्वात ‘लॉर्ड’ नावाने लोकप्रिय असलेल्या शार्दूल ठाकूरचा तडाखा रविवारी तामिळनाडू संघाला बसला.
रणजी ट्रॉफी: शार्दूलच्या शतकाचा तामिळनाडूला तडाखा; उपांत्य लढतीत मुंबईचा संघ पोहोचला सुस्थितीत

मुंबई : क्रीडा विश्वात ‘लॉर्ड’ नावाने लोकप्रिय असलेल्या शार्दूल ठाकूरचा तडाखा रविवारी तामिळनाडू संघाला बसला. गरजेच्या वेळी संघासाठी धावून येत शार्दूलने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. ७ बाद १०६ धावांवरून शार्दूलने १०५ चेंडूंत फटकावलेल्या १०९ धावांच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य लढतीत दुसऱ्या दिवसअखेर १०० षटकांत ९ बाद ३५३ धावांपर्यंत मजल मारली.

बीकेसी येथे सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर मुंबईकडे पहिल्या डावात तब्बल २०७ धावांची आघाडी आहे. शार्दूल बाद झाला असला तरी तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे ही अखेरची धोकादायक जोडी खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. उपांत्यपूर्व लढतीत शेवटच्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल द्विशतकी भागीदारी रचली होती. आताही या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी अद्याप ६३ धावांची भर घातली आहे. २५ वर्षीय तनुष १० चौकारांसह ७४, तर तुषार २ चौकारांसह १७ धावांवर नाबाद आहे.

शनिवारी तामिळनाडूचा पहिला डाव अवघ्या १४६ धावांत आटोपल्यावर मुंबईने पहिल्या दिवसअखेर २ बाद ४५ धावा केल्या होत्या. तेथून पुढे रविवारी दुसऱ्या दिवसाला सुरुवात करताना तामिळनाडूचा कर्णधार तसेच डावखुरा फिरकीपटू आर. साई किशोरपुढे मुंबईची फलंदाजी ढेपाळली. किशोरने पहिल्याच षटकात नाइट वॉचमन मोहित अवस्थीला (२) यष्टिचीत केले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे व किशोरवयीन मुशीर खान यांनी २० षटके संथ फलंदाजी करताना फक्त ४३ धावा केल्या. अखेर किशोरनेच रहाणेला (१९) बाद करून मुंबईला चौथा धक्का दिला.

यानंतर मैदानावर श्रेयस अय्यरचे आगमन झाले. मात्र संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर तो ३ धावांवरच त्रिफळाचीत झाला. दुसऱ्या बाजूने १९ वर्षीय मुशीरने ६ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मात्र किशोरने मुशीर व शम्स मुलाणी (०) यांना एकाच षटकात बाद करून मुंबईची ७ बाद १०६ अशी केविलवाणी अवस्था केली. त्यावेळी मुंबईचा संघ पहिल्या डावात ४० धावांनी पिछाडीवर होता.

३२ वर्षीय शार्दूलने मात्र पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणावर भर दिला. यष्टिरक्षक हार्दिक तामोरेने (३५) त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी १०५ धावांची मोलाची भागीदारी रचून मुंबईला आघाडी मिळवून दिली. किशोरने हार्दिकला बाद केल्यावर तनुष व शार्दूल यांची जोडी जमली. त्यांनी चहापानाला मुंबईला ८ बाद २४८ धावांपर्यंत नेले. मग तिसऱ्या सत्रात ८१व्या षटकात अजित रामला षटकार लगावून शार्दूलने झुंजार शतक साकारले. शतकानंतर त्याने केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता.

शार्दूल व तनुष यांनी नवव्या विकेटसाठी ७९ धावांची भर घातली. अखेर कुलदीप सेनने शार्दूलचा अडथळा दूर केला. शार्दूलने १३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना चाहत्यांचे मनोरंजन केले. दुसरीकडे तनुषने अर्धशतक साकारून मुंबईची आघाडी २०० धावांपलीकडे नेली. आता तिसऱ्या दिवशी तनुष-तुषारची जोडी तामिळनाडूला आणखी किती काळ सतावणार, हे पाहणे रंजक ठरेल.

संक्षिप्त धावफलक

-तामिळनाडू (पहिला डाव) : १४६

- मुंबई (पहिला डाव) : १०० षटकांत ९ बाद ३५३ (शार्दूल ठाकूर १०९, तनुष कोटियन नाबाद ७४, मुशीर खान ५५; आर. साई किशोर ६/९७)

logo
marathi.freepressjournal.in