अखेरच्या जोडीचा ऐतिहासिक शतकी धडाका! १०व्या-११व्या क्रमांकावरील तनुष कोटियन-तुषार देशपांडेची विक्रमी कामगिरी

मुंबईच्या अखेरच्या जोडीने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
अखेरच्या जोडीचा ऐतिहासिक शतकी धडाका! १०व्या-११व्या क्रमांकावरील तनुष कोटियन-तुषार देशपांडेची विक्रमी कामगिरी

मुंबई : १०व्या क्रमांकावरील तनुष कोटियन (१२९ चेंडूंत नाबाद १२० धावा) आणि ११व्या क्रमांकावरील तुषार देशपांडे (१२९ चेंडूंत १२३ धावा) या मुंबईच्या जोडीने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. या दोघांनी वैयक्तिक शतके साकारण्यासह अखेरच्या विकेटसाठी २४० चेंडूंत २३२ धावांची भागीदारी रचली. मुंबई-बडोदा यांच्यातील ही लढत अनिर्णित राहिली. मात्र मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बीकेसी येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने सोमवारच्या ९ बाद ३७९ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. त्यावेळी २५ वर्षीय तनुष ३२ धावांवर, तर २८ वर्षीय तुषार २३ धावांवर होता. मुंबईकडे एकूण ४१५ धावांची आघाडी होती. मात्र बडोद्याला सामन्यात परतण्याची संधीच न देण्याच्या हेतूने या दोघांनी चौफेर टोलेबाजी केली. तनुषने १० चौकार व ४ षटकारांसह प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिले शतक साकारले. मग तुषारनेसुद्धा १० चौकार व तब्बल ८ षटकारांसह पहिल्यावहिल्या शतकाची वेस ओलांडली. ३३७ धावांवर मुंबईने नववा फलंदाज गमावला होता. त्यानंतर या दोघांनी तब्बल ४० षटके फलंदाजी करून २३२ धावा फटकावल्या. अखेर निनाद राठवाने तुषारला बाद करून ही जोडी फोडली व मुंबईचा दुसरा डाव १३२ षटकांत ५६९ धावांवर संपुष्टात आणला. तनुष १२० धावांवर नाबाद राहिला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल ७८ वर्षांनी १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाजाने शतके झळकावली, हे विशेष.

त्यानंतर बडोद्यापुढे विजयासाठी ६०६ धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले. तसेच त्यांच्याकडे फक्त ५८ षटके शिल्लक होती. बडोद्याने ३० षटकांत ३ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारलेली असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपसी सहमतीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. पहिल्या डावात द्विशतक साकारणारा मुशीर खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता २ मार्चपासून मुंबईची बीकेसी येथेच उपांत्य सामन्यात तामिळनाडूशी गाठ पडेल. अन्य उपांत्य लढतीत विदर्भ आणि मध्य प्रदेश आमनेसामने येतील.

श्रेयस वळला रणजीकडे; उपांत्य सामना खेळणार

मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरचा तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. श्रेयसला पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांना मुकावे लागले. तसेच तो रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यातही खेळला नाही. यादरम्यान, श्रेयस तंदुरुस्त असूनही त्याने जाणीवपूर्वक रणजीचा उपांत्यपूर्व सामना खेळला नाही, अशी बातमी समोर आली. मात्र २९ वर्षीय श्रेयसने दुखापतीचा विचार करता सावधगिरीची भूमिका घेत ही लढत न खेळण्याचा निर्णय घेतला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून २ मार्चपासून रंगणाऱ्या उपांत्य सामन्यासाठी उपलब्ध आहे. मध्यंतरी श्रेयस डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळणार असल्याचेही समजले होते. स्नायूंच्या दुखापतीमुळे मुंबईचा शिवम दुबे मात्र उपांत्य लढतीसही मुकणार आहे.

g मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकल, मुशीर खान, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, धवल कुलकर्णी.

logo
marathi.freepressjournal.in