रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुशीरची गोलंदाजीतही चमक; मुंबईला आघाडी घेण्याची संधी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या साखळी सामन्यातील दुसऱ्या दिवशी मुंबईच्या मुशीर खानने गोलंदाजीतही चमक दाखवली. दुसऱ्या दिवसअखेर हरयाणाने २ बाद १०८ धावा केल्या असून मुंबईकडे अद्यापही ३२२ धावांची आघाडी आहे. मुशीरनेच दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुशीरची गोलंदाजीतही चमक; मुंबईला आघाडी घेण्याची संधी
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुशीरची गोलंदाजीतही चमक; मुंबईला आघाडी घेण्याची संधीX
Published on: 

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या साखळी सामन्यातील दुसऱ्या दिवशी मुंबईच्या मुशीर खानने गोलंदाजीतही चमक दाखवली. दुसऱ्या दिवसअखेर हरयाणाने २ बाद १०८ धावा केल्या असून मुंबईकडे अद्यापही ३२२ धावांची आघाडी आहे. मुशीरनेच दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत पहिल्या दिवसअखेर कर्णधार सिद्धेश लाड २९, तर सर्फराझ खान २१ धावांवर नाबाद होता. त्यामुळे मुंबई दुसऱ्या दिवशी किमान ५०० ते ६०० धावांचे शिखर उभारण्यास उत्सुक होती. मात्र १३०.४ षटकांत मुंबईचा संघ ४३० धावांत गारद झाला. अंक्रिशने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले, तर मुशीरने यंदाच्या स्पर्धेतील तिसऱ्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले. मुंबईने पहिल्या दोन साखळी सामन्यांत बोनस गुणांसह विजय नोंदवताना अनुक्रमे चंदीगड व हिमाचल प्रदेशला सहज धूळ चारली. मुंबईचा संघ गटात १४ गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे. अनेक अनुभवी खेळाडू अनुपस्थितीत असूनही मुंबई छाप पाडत आहे.

मुंबईला सलामीवीर दिव्यांश सक्सेना (१०) याच्या रूपाने सुरुवातीलाच धक्का बसला. मात्र, त्यानंतर अंक्रिश आणि मुशीरने हरयाणाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईला भक्कम स्थितीत पोहोचवले. कोलकाताकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अंक्रिशने १८० चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ११४ धावा केल्या. मुशीरने १८५ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह १०९ धावा फटकावल्या.

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. १७ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in