रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून; सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार; गिल, जडेजा यांच्याकडेही लक्ष

देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ९१व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला गुरुवार, २२ जानेवारीपासून प्रारंभ होईल. भारतीय संघात स्थान मिळवण्यास तसेच संघातील स्थान टिकवण्यास आतुर असलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून; सिद्धेश लाड मुंबईचा कर्णधार; गिल, जडेजा यांच्याकडेही लक्ष
Published on

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ९१व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला गुरुवार, २२ जानेवारीपासून प्रारंभ होईल. भारतीय संघात स्थान मिळवण्यास तसेच संघातील स्थान टिकवण्यास आतुर असलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात पार पडला. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगली. आता २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा समाप्त होईल. तूर्तास सर्व संघांचे पाच साखळी सामने झाले असून उर्वरित दोन लढती शिल्लक आहेत. त्यानंतर बाद फेरीला प्रारंभ होईल.

गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.

दरम्यान, शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्याने सिद्धेश लाडकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ड-गटात अग्रस्थानी असलेला मुंबईचा संघ हैदराबादविरुद्ध त्यांच्या मैदानात दोन हात करणार आहे. मुंबईने पाचपैकी तीन सामने जिंकले असून २ लढती अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात २४ गुण जमा आहेत.

त्याशिवाय भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल, अनुभवी रवींद्र जडेजा हे खेळाडू रणजीत खेळताना दिसतील. सध्या भारतीय संघ टी-२० मालिका खेळत असून त्यानंतर टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे भारताच्या टी-२० संघाचा भाग नसलेले बहुतांश खेळाडू रणजीत खेळताना दिसतील. गिलचा समावेश असलेला पंजाबचा संघ गुरुवारपासून जडेजाचच समावेश असलेल्या सौराष्ट्रशी दोन हात करणार आहे. सर्व सामने सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू होतील. ठराविक लढतींचे स्टार स्पोर्ट्सवर प्रक्षेपण करण्यात येईल.

मुंबईचा संघ

सिद्धेश लाड (कर्णधार), मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सुवेद पारकर, सर्फराझ खान, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, आकाश पारकर, साईराज पाटील, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओमकार तरमाळे, सेल्व्हेस्टर डीसोझा, हिमांशू सिंग.

logo
marathi.freepressjournal.in