हिमांशूच्या शतकामुळे मध्य प्रदेशला आघाडी; दुसऱ्या दिवसअखेर विदर्भ ६९ धावांनी पिछाडीवर

सलामीवीर हिमांशू मंत्रीने (२६५ चेंडूंत १२६ धावा) साकारलेल्या जिगरबाज शतकाच्या बळावर मध्य प्रदेशने रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भाविरुद्ध पहिल्या डावात ८२ धावांची निर्णायक आघाडी मिळवली.
हिमांशूच्या शतकामुळे मध्य प्रदेशला आघाडी; दुसऱ्या दिवसअखेर विदर्भ ६९ धावांनी पिछाडीवर

नागपूर : सलामीवीर हिमांशू मंत्रीने (२६५ चेंडूंत १२६ धावा) साकारलेल्या जिगरबाज शतकाच्या बळावर मध्य प्रदेशने रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भाविरुद्ध पहिल्या डावात ८२ धावांची निर्णायक आघाडी मिळवली. त्यानंतर विदर्भाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद १३ धावा केल्या असून ते अद्याप ६९ धावांनी पिछाडीवर आहेत.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत शनिवारी मध्य प्रदेशने विदर्भाचा पहिला डाव १७० धावांत गुंडाळला. मग रविवारी १ बाद ४७ धावांवरून पुढे खेळताना उमेश यादव व यश ठाकूर या वेगवान गोलंदाजांपुढे त्यांची दैना उडाली. कर्णधार शुभम शर्मा (१), व्यंकटेश अय्यर (०), हर्ष गवळी (२५), सारांश जैन (३०) यांना छाप पाडता आली नाही. हिमांशूने मात्र एक बाजू सांभाळून १३ चौकार व १ षटकारासह प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सहावे शतक साकारले. त्यामुळे २०२२च्या विजेत्या मध्य प्रदेशने ९४.३ षटकांत २५२ धावा केल्या. त्यांना पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी मिळाली. उमेश व यश यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले.

त्यानंतर दुसऱ्या डावात विदर्भाने अथर्व तायडेला (२) स्वस्तात गमावले. आवेश खानने त्याला पायचीत पकडले. दिवसअखेर ध्रुव शोरे १०, तर नाइट वॉचमन अक्षय वाखरे १ धावेवर नाबाद आहे. सोमवारी लढतीचा तिसरा दिवस असून विदर्भ ६९ धावांची पिछाडी भरून काढत मध्य प्रदेशसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

संक्षिप्त धावफलक

-विदर्भ (पहिला डाव) : १७०

- मध्य प्रदेश (पहिला डाव) : ९४.३ षटकांत सर्व बाद २५२ (हिमांशू मंत्री १२६, सारांश जैन ३०; उमेश यादव ३/४०, यश ठाकूर ३/५१)

-विदर्भ (दुसरा डाव) : ४ षटकांत १ बाद १३ (ध्रुव शोरे नाबाद ७, अथर्व तायडे २; आवेश खान १/२)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in