नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघाकडून खेळणार आहे. अश्विनने स्वतः ट्विटरवर याची घोषणा केली. भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर प्रथमच एखादा खेळाडू बिग बॅश लीगमध्ये सहभागी होणार आहे.
अश्विनने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या वर्षी २७ ऑगस्ट रोजी त्याने इंडियन प्रीमियर लीगमधूनही निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे त्याला परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली. यापूर्वी, भारताचे उन्मुक्त चंद व निखिल चौधरी हे खेळाडू बिग बॅश लीगमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र त्यांनी भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. त्यामुळे अश्विन हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरणार आहे. डेव्हिड वॉर्नर या संघाचा कर्णधार आहे.