'आयपीएल हे शरीर; कसोटी मात्र श्वास'

अश्विन गुरुवारी भारताकडून १०० कसोटी खेळणारा १४वा खेळाडू ठरला. यावेळी अश्विनचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून विशेष टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
'आयपीएल हे शरीर; कसोटी मात्र श्वास'
Published on

धरमशाला : अश्विन गुरुवारी भारताकडून १०० कसोटी खेळणारा १४वा खेळाडू ठरला. यावेळी अश्विनचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून विशेष टोपी देऊन सत्कार करण्यात आला. अश्विनची पत्नी प्रीती आणि मुलेसुद्धा यावेळी उपस्थित होत्या. अश्विनने यावेळी कसोटी क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भारतीय संघाने अश्विनला ‘गार्ड ऑफ ऑनर’ही दिला.

“आयपीएल ही चांगली स्पर्धा आहे. सध्याच्या काळात वेगवान निकाल चाहत्यांना अपेक्षित असतो. युवा क्रिकेटपटूही आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. मात्र खरे सांगू तर कसोटी क्रिकेटची सर कोणालाच नाही. तो जणू श्वास आहे. आयुष्यातील आव्हानांना कसे सामोरे जायचे, हे कसोटी क्रिकेट तुम्हाला शिकवते. त्यामुळे टी-२० क्रिकेट खेळा, मात्र कसोटीचा आनंद लुटण्यात कमी राहू नका,” असे अश्विन म्हणाला.

पडिक्कलसाठी विशेष संदेश

कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल हा भारताचा कसोटी प्रकारातील ३१४वा खेळाडू ठरला. अश्विनच्याच हस्ते पडिक्कलला ‘टेस्ट कॅप’ देण्यात आली. त्यावेळी अश्विन त्याला म्हणाला की, “आयुष्यात तू केलेल्या मेहनतीचे खरे फळ आता मिळायला सुरुवात झाली आहे. कर्नाटकने या देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत. त्याचे दडपण न बाळगता तू खेळाचा आनंद लूट आणि भारतासाठी प्रामाणिकपणे योगदान दे.”

logo
marathi.freepressjournal.in