बंगळुरूची चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

बंगळुरूची चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (२१ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू सूयश शर्मा (१७ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी माऱ्याला फिल सॉल्टच्या (२७ चेंडूंत नाबाद ५६ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाला ८ गडी आणि ६० चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
Published on

मुल्लानपूर : वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (२१ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू सूयश शर्मा (१७ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी माऱ्याला फिल सॉल्टच्या (२७ चेंडूंत नाबाद ५६ धावा) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाला ८ गडी आणि ६० चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता मंगळवारी अंतिम सामना रंगणार आहे. तर पंजाबलाही आणखी एक संधी आहे. सूयश सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

मुल्लानपूरला झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ १४.१ षटकांत १०१ धावांत गारद झाला. मार्कस स्टोईनिस (२६) वगळता पंजाबचा एकही फलंदाज २० धावांपुढेही जाऊ शकला नाही. हेझलवूडने जोश इंग्लिस (४), कर्णधार श्रेयस अय्यर (२) व अझमतुल्ला ओमरझाई (१८) यांचे बळी मिळवले. त्यानंतर सूयशने शशांक सिंग (३), मुशीर खान (०) व स्टोइनिस यांना जाळ्यात अडकवले. यश दयालने दोन, तर भुवनेश्वर कुमार व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहली मात्र १२ चेंडूंत १२ धावा केल्यावर कायले जेमिसनचा शिकार ठरला. सॉल्टने मात्र आक्रमण कायम राखताना ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. त्याने हंगामातील चौथे अर्धशतक साकारताना मयांक अगरवालसह (१९) दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भर घातली. मुशीरने मयांकचा अडसर दूर केला. मात्र रजत पाटीदारने (८ चेंडूंत नाबाद १५) सॉल्टच्या साथीने औपचारिकता पूर्ण केली. अखेरीस १०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मुशीरला षटकार लगावून पाटीदारने थाटात बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बंगळुरूने यापूर्वी २००९, २०१२ व २०१६मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे यंदा विराटसह बंगळुरूच्या तमाम चाहत्यांची स्वप्नपूर्ती होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in