RCB vs GT : चिन्नास्वामीत आज धावांच्या वर्षावाची हमी!बंगळुरू-गुजरात यांच्यातील सामन्यात फलंदाजांच्या जुगलबंदीकडे लक्ष

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.
RCB vs GT : चिन्नास्वामीत आज धावांच्या वर्षावाची हमी!बंगळुरू-गुजरात यांच्यातील सामन्यात फलंदाजांच्या जुगलबंदीकडे लक्ष
Published on

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. सीमारेषेच्या तुलनेने लहान स्टेडियम आणि फलंदाजांना पोषक खेळपट्टीमुळे येथे चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन होईल. या लढतीच्या निमित्ताने विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यातील द्वंद्वही क्रीडाप्रेमींना पाहता येईल.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा बंगळुरूचा संघ सध्या सलग दोन विजयांसह गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे. मुख्य म्हणजे बंगळुरूने दोन्ही लढती या विरोधी संघाच्या मैदानात जिंकल्या आहेत. सलामीला कोलकाताला धूळ चारल्यावर बंगळुरूने दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईला नमवले. त्यामुळे बंगळुरूची धावगतीही उत्तम आहे. आता घरच्या मैदानात आपल्या प्रेक्षकांसमोर खेळण्यास बंगळुरूचा संघ आतुर आहे. मात्र येथे यापूर्वीच्या हंगामात काही वेळा २०० पेक्षा अधिक धावा उभारूनही बंगळुरूच्या गोलंदाजांना त्याचा बचाव करता आलेला नाही. तसेच बंगळुरूमध्ये दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने गोलंदाजांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यंदा बंगळुरूचे गोलंदाज कशी कामगिरी करतात, यावर संघाचे भवितव्य अवलंबून असेल.

दुसरीकडे गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने २ पैकी १ लढत जिंकली आहे. सलामीला पंजाबकडून पराभव पत्करल्यावर गुजरातने अहमदाबाद येथे मुंबईला धूळ चारली. गुजरातचा संघ यंदाच्या हंगामात प्रथमच प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात खेळणार आहे. गुजरातकडेही धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असल्याने बंगळुरूच्या गोलंदाजांविरुद्ध ते कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल. गतवर्षी बंगळुरूने गुजरातला दोन्ही साखळी सामन्यांत नमवले होते. त्यामुळे गुजरातला बाद फेरीही गाठता आली नाही. आता हा संघ त्या पराभवाचा वचपा घेण्यासह विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

विराट, पाटीदारवर बंगळुरूची भिस्त

बंगळुरूच्या संघात विराट आणि पाटीदार यांच्या रूपात फिरकीला उत्तम खेळू शकणारे फलंदाज आहेत. मात्र षटकारांच्या आतषबाजीसाठी बंगळुरूची मुख्य भिस्त फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टिम डेव्हिड या विदेशी फलंदाजांच्या त्रिकुटावर आहे. तसेच देवदत्त पडिक्कलही मधल्या फळीत छाप पाडत आहे. गोलंदाजीचा विचार करता जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंची जोडी बंगळुरूसाठी सातत्याने चमक दाखवत आहे. विशेषत: हेझलवूडने एकाही लढतीत २४ पेक्षा अधिक धावा दिलेल्या नाहीत. कृणाल पंड्या व सूयश शर्मा यांच्यावर फिरकीची मदार आहे. यश दयाल अखेरच्या षटकात धावा रोखू शकतो. त्यामुळे सांघिक कामगिरीचा विचार करता कागदावर बंगळुरूचा संघ वरचढ वाटत आहे.

गुजरातचे गिल, बटलर लयीत

गुजरातसाठी गिल, जोस बटलर व डावखुरा साई सुदर्शन या आघाडीच्या तीन फलंदाजांचा खेळ निर्णायक ठरेल. मधल्या फळीत राहुल तेवतिया, शाहरूख खान यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही. शर्फेन रुदरफोर्डच्या जागी ग्लेन फिलिप्सला खेळवण्याचा पर्यायही गुजरातकडे आहे. गोलंदाजीचा विचार करता रशिद खानला अद्याप लय मिळालेली नाही. त्यामुळे गुजरातला वेगवान गोलंदाजांवर अधिक विसंबून रहावे लागत आहे. प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा असे वेगवान त्रिकुट त्यांच्याकडे आहे. डावखुरा फिरकीपटू आर. साईकिशोर मात्र प्रभावी गोलंदाजी करण्यासह बळीही मिळवत आहे. त्यामुळे गुजरातचा संघ बंगळुरूला नक्कीच कडवी झुंज देऊ शकतो.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ आयपीएल सामन्यांपैकी बंगळुरूने ३, तर गुजरातने २ लढतींमध्ये बाजी मारली आहे. त्यातही २०२४मध्ये बंगळुरूने दोन्ही सामन्यांत गुजरातवर वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे आता गुजरात पलटवार करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, ग्लेन फिलिप्स, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in