दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार; गतविजेत्या बंगळुरूचे पारडे जड; गुजरातही धक्का देण्याच्या तयारीत

RCB vs GT, IPL 2026 : यंदाची आयपीएल आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सलग दुसऱ्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरी गाठली असून त्यांच्यासमोर आता रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात पाच वर्षांत तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या गुजरात टायटन्सचे आव्हान असेल. दोन्ही संघांनी एकदा आयपीएलवर नाव कोरले असल्याने दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य असेल.
दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार; गतविजेत्या बंगळुरूचे पारडे जड; गुजरातही धक्का देण्याच्या तयारीत
दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी भिडणार; गतविजेत्या बंगळुरूचे पारडे जड; गुजरातही धक्का देण्याच्या तयारीतPhoto : X
Published on

अहमदाबाद: यंदाची आयपीएल आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. सलग दुसऱ्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरी गाठली असून त्यांच्यासमोर आता रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात पाच वर्षांत तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलेल्या गुजरात टायटन्सचे आव्हान असेल. दोन्ही संघांनी एकदा आयपीएलवर नाव कोरले असल्याने दुसऱ्या जेतेपदाचे लक्ष्य असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या महाथराराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानात उतरणार आहे. कागदावर सध्याचे विजेते बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे. या स्पर्धेत आरसीबीने अत्यंत निर्भीड आणि आक्रमक खेळ केला असून याच शैलीच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे.

विराट देवदत्त कोहली, पडिक्कल, टीम डेव्हिड, कर्णधार रजत पाटीदार, फिल सॉल्ट आणि व्यंकटेश अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर सातत्याने दबाव टाकला आहे. खेळपट्टीचे स्वरूप किंवा प्रतिस्पध्र्थ्यांची रणनीती याचा विचार न करता त्यांनी केवळ आक्रमक फटकेबाजीवर भर दिला. यंदाच्या हंगामात सर्वाधिक वेळा दोनशेहून अधिक धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम बंगळुरूच्या नावावर आहे. पाटीदारच्या संथ आणि संयमी नेतृत्वामुळे गेल्या दोन हंगामात बंगळुरूच्या संघात मोठी स्थिरता आली आहे. माजी कर्णधार कोहली किंवा फॅफ डू प्लेसिस यांच्याइतका तो आक्रमक दिसत नसला तरी ३२ वर्षीय पाटीदारने नवोदित आणि ज्येष्ठ खेळाडूंना सोबत घेऊन उत्तम कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या संघाने संथ पण सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली आहे. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीवीरांनी यंदा ९ पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. गुजरातची मधली फळी कमकुवत असल्यामुळे गिल, सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. गिलने ७२२, सुदर्शनने ७१० आणि बटलरने ५०७ धावा करत संघाला नेहमीच तारले आहे. गोलंदाजीत आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारने २६ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याला जोश हेझलवूड, रसिक सलाम आणि कृणाल पंड्या यांची उत्तम साथ लाभली असून हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खेळपट्टी खोलवर फलंदाजी आणि फटकेबाजांची फौज यामुळे अंतिम सामन्यात त्यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, अहमदाबादची गोलंदाजीला पूरक ठरल्यास बंगळुरूच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याची ताकद गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीत आहे. गुजरातकडे यंदाच्या हंगामात २८ विकेट्स घेणारा पर्पल कॅपचा मानकरी कॅगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, रशिद खान, जेसन होल्डर आणि प्रसिध कृष्णा अशी दर्जेदार गोलंदाजीची फळी आहे.

मोहम्मद सिराजची तंदुरुस्ती गुजरातसाठी महत्त्वपूर्ण

रबाडा आणि सिराज या जोडीने या हंगामात अनुक्रमे १६५ आणि १६२ निर्धाव चेंडू फेकत फलंदाजांवर वर्चस्व राखले आहे. त्यांनी खेळपट्टयांवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मोठ्या फटकेबाजांना मनसोक्त धावा काढण्यापासून रोखले आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातसाठी मोहम्मद सिराजची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी मुल्लानपूर येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गोलंदाजी करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्याला वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती. त्याने चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला असला तरी तो त्रस्त दिसत होता. ही दुखापत गंभीर नसावी अशी आशा गुजरातचा संघ करत आहे. सिराजच्या तंदुरुस्तीचा प्रश्न असला तरी मैदानावरील गणिते फारशी बदलणार नाहीत.

चेन्नई, मुंबईनंतर आरसीबीसुद्धा सलग जेतेपदे पटकावणार?

सध्याच्या घडीला आरसीबी हाच जेतेपदासाठी सर्वांचा आवडता संघ आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा तिसरा संघ बनण्यासाठी आरसीबी सज्ज झाली आहे. दुसरीकडे, कोणताही दबाव न घेता खेळणारा गुजरातचा संघ बंगळुरूचा विजयरथ रोखून त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न करेल. यामुळे हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या खेळाडूंवर नजरा

विराट कोहली : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज म्हणजे विराट कोहली. यावर्षी कोहलीने ४६० धावा केल्या असून त्याची फायनलमधील कामगिरी आरसीबीसाठी मोलाची ठरणार आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याची सरासरी ६०पेक्षा अधिक आहे.

रजत पाटीदार : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शांत आणि संयमी कर्णधार असलेल्या रजत पाटीदारने आपल्या संघाला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्याने क्लालिफायर-१ सामन्यात केलेली ३३ चेंडूंतील ९३ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली होती.

शुभमन गिल : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा संघाच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. त्याने यंदाच्या मोसमात ७२२ धावा करत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. क्लालिफायर-२ सामन्यात गिलने शतक झळकावत आपल्या संघाला अंतिम फेरीचे द्वार खुले करून दिले आहे.

मोहम्मद सिराज : गुजरात टायटन्सच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त असलेल्या मोहम्मद सिराजने २०२६ मोसमात आतापर्यंत १८ विकेट्स मिळवले आहेत. आरसीबीकडून अनेक वर्षे खेळल्यामुळे बंगळुरूच्या फलंदाजांना कसे रोखायचे, याची पुरेपूर कल्पना सिराजला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टीम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, रिचर्ड ग्लीसन.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुसैन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओ हॉटस्टार अॅप

सामन्याचे ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

logo
marathi.freepressjournal.in