‘क्वालिफायर-१’साठी बंगळुरू उत्सुक! लखनऊ विरुद्ध आज होणारा सामना जिंकल्यास अव्वल दोन संघांतील स्थान निश्चित
लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १८व्या हंगामाची अखेरची साखळी लढत मंगळवारी रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अव्वल दोन संघांतील स्थान पक्के करण्यासह ‘क्वालिफायर-१’साठीही पात्र ठरण्याची उत्तम संधी आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ मात्र घरच्या मैदानात हंगामाचा शेवट गोड करण्यास आतुर असेल. लखनऊमधील इकाना स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येतील.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूचे सध्या १७ गुण असून त्यांनी बाद फेरीतील प्रवेश पक्का केला आहे. मात्र शुक्रवारी हैदराबादविरुद्ध बंगळुरूला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता विजयपथावर परतण्यासाठी बंगळुरूचा संघ उत्सुक असेल. बंगळुरूने अखेरची लढत जिंकल्यास ते १९ गुणांसह पहिल्या दोन संघांतली स्थान पक्के करतील. कोलकाताविरुद्धची बंगळुरूची चिन्नास्वामी येथील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. हा गुण बंगळुरूसाठी निर्णायक ठरू शकतो. मात्र दक्षिण आफ्रिका व इंग्लंडचे काही खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी माघारी परतल्याने बंगळुरूला फटकाही बसू शकतो. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे पुनरागमन त्यांच्यासाठी फलदायी ठरू शकते.
दरम्यान, या लढतीत पुन्हा एकदा विराट कोहली चाहत्यांच्या केंद्रस्थानी असेल. १२ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर करणाऱ्या विराटला आता आयपीएल आणि भारताच्या एकदिवसीय सामन्यांतच खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. लखनऊमध्ये मंगळवारी ज्या खेळपट्टीवर लढत होणार आहे, ती फलंदाजांसह वेगवान गोलंदाजांना पोषक ठरू शकते. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. गेल्या सामन्यात येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सव्वादोनशे धावा केल्या होत्या.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. लखनऊचे १३ सामन्यांत फक्त १२ गुण आहेत. मात्र गेल्या सामन्यात लखनऊने गुजरातला नमवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. तसेच आता घरच्या मैदानात अखेरचा सामना खेळून हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी लखनऊचा संघ आतुर असेल. लखनऊचे सर्व प्रमुख खेळाडू या लढतीसाठी उपलब्ध असतील, असे समजते. त्यामुळे लखनऊ बंगळुरूच्या मार्गात अडथळा ठरणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
विराटवर भिस्त, हेझलवूडही परतला
बंगळुरूसाठी यंदाच्या हंगामात विराट कोहलीने सातत्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे फलंदाजीत त्याच्यावर पुन्हा एकदा लक्ष असेल. फिल सॉल्टनेही गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले. पाटीदार व जितेश शर्मा यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. तसेच मयांक अगरवालनेही जबाबदारीने खेळ करण्याची गरज आहे. जेकब बिथेल व लुंगी एन्गिडी हे खेळाडू आता उपलब्ध नसतील. त्यामुळे बंगळुरू टिम सेईफर्ट किंवा ब्लेसिंग मुझरबानीला संधी देऊ शकते. मात्र हेझलवूड ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्याने बंगळुरूची चिंता मिटली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हेझलवूडने १० सामन्यांत १८ बळी मिळवले आहेत. मात्र दुखापतीमुळे तो काही सामन्यांना मुकला होता. तसेच यश दयाल व भुवनेश्वर कुमार या भारतीय मध्यमगती गोलंदाजांनाही कामगिरीत सुधारणा करावी लागेल. फिरकीपटू सुयश शर्मा व कृणाल पंड्या यांना मधल्या षटकांत धावा रोखाव्या लागतील.
क्वालिफायर-१ ठरतेय जेतेपदासाठी लकी
२०११पासून आयपीएलमध्ये क्वालिफायर-१ व एलिमिनेटरची प्रथा सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजे २०१६मध्ये तिसऱ्या क्रमांकावरील संघाने आयपीएल जिंकली आहे. अन्यथा पहिल्या दोन स्थानांवरील म्हणजेच क्वालिफायर-१ खेळणाऱ्या संघांपैकीच एकाने विजेतेपद मिळवलेले आहे. त्यामुळे प्रत्येक संघ पहिल्या दोन क्रमांकात जागा मिळवण्यास आतुर असतो.
अखेरच्या लढतीत पंत चमकणार?
लखनऊसाठी या हंगामात मिचेल मार्श व एडीन मार्करम यांनी प्रत्येकी पाच अर्धशतके साकारली आहेत. त्यातच गेल्या लढतीत मार्शने गुजरातविरुद्ध शतक झळकावल्याने त्यांची भिस्त विदेशी फलंदाजांवरच आहे. मात्र मार्करम आता मायदेशी परतला आहे. निकोलस पूरन धडाकेबाज फॉर्मात आहे. कर्णधार पंतसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. त्यामुळे तो अखेरच्या लढतीत छाप पाडण्यास आतुर असेल. गोलंदाजीत लेगस्पिनर दिग्वेश राठी या लढतीसाठी संघात परतण्याची शक्यता आहे. विराटविरुद्ध त्याची गोलंदाजी आल्यास चाहत्यांना द्वंद्व पाहता येईल. शार्दूल ठाकूर, आकाश दीप व आवेश खान असे वेगवान त्रिकुट लखनऊकडे आहे. मात्र न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओरूर्क त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड, मयांक अगरवाल, जोश हेझलवूड, ब्लेसिंग मुझरबानी, टिम सेईफर्ट.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर, विल ओरूर्क.
३-२
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी बंगळुरूने ३, तर लखनऊने २ लढती जिंकल्या आहेत. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येत आहेत. २०२४मध्ये उभय संघांत झालेल्या एकमेव लढतीमध्ये लखनऊने बाजी मारली होती. मात्र यंदा बंगळुरूचे पारडे जड वाटत आहे. तर लखनऊचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप