IPL 2026 : चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता हळूहळू रंगू लागला आहे. बुधवारी या स्पर्धेतील २३व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत गोलंदाजांचा कस लागणार असून दोन्ही संघांतील फलंदाज धावांचा वर्षाव करण्यासाठी आतुर असतील.
चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित
चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस; बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षितX
Published on

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता हळूहळू रंगू लागला आहे. बुधवारी या स्पर्धेतील २३व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत गोलंदाजांचा कस लागणार असून दोन्ही संघांतील फलंदाज धावांचा वर्षाव करण्यासाठी आतुर असतील.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

दरम्यान, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने आतापर्यंत चारपैकी ३ लढती जिंकल्या असून ते अव्वल चार संघांत स्थान टिकवून आहेत. बंगळुरूने गेल्या लढतीत मुंबईला वानखेडेवर १८ धावांनी पराभूत केले. आतापर्यंतच्या चारही सामन्यांत बंगळुरूने २००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांपैकी चेन्नई व मुंबईविरुद्ध तर प्रथम फलंदाजी करताना त्यांनी अनुक्रमे २५० व २४० धावांचा डोंगर उभारला. तसेच बंगळुरूने यंदा चिन्नास्वामी येथील दोन्ही लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आता घरच्या मैदानात बंगळुरूचा संघ आणखी एक विजय नोंदवण्यासाठी आतुर असेल.

बंगळुरूचा पाटीदार भन्नाट फॉर्मात असून फिल सॉल्टलासुद्धा आता लय गवसली आहे. त्याशिवाय विराट कोहली, टिम डेव्हिड सातत्याने छाप पाडत आहेत. गोलंदाजीत जोश हेझलवूडविषयी संभ्रम असला तरी कृणाल पंड्या व सूयश शर्मा यांची फिरकी जोडी कमाल करत आहे. भुवनेश्वर कुमार अनुभवाच्या बळावर टिच्चून मारा करत आहे. रसिक सलामच्या तंदुरुस्तीविषयी शंका असल्याने अभिनंदन किंवा मंगेश यादवला संधी दिली जाऊ शकते. रोमारिओ शेफर्डच्या अष्टपैलू योगदानाचा बंगळुरूला अद्याप तितका लाभ झालेला नाही. त्यामुळे हेझलवूड परतल्यास शेफर्डला विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊने चारपैकी दोन लढती जिंकल्या आहेत. गेल्या सामन्यात लखनऊचा गुजरातकडून पराभव झाला. मिचेल मार्श, एडीन मार्करम, पंत, निकोलस पूरन, मुकूल चौधरी असे फलंदाज असूनही लखनऊला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तसेच गोलंदाजीत मोहम्मद शमी व फिरकीपटू दिग्वेश राठी यांच्यावर हा संघ अवलंबून आहे. प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनीही चांगली कामगिरी केली आहे. मयांक यादव व मोहसिन खान हे दोन वेगवान गोलंदाज आता तंदुरुस्त असून ते बुधवारी खेळणार का, याकडे लक्ष असेल. तूर्तास कागदावर तरी बंगळुरूचे पारडे जड दिसत आहे. मात्र लखनऊचा संघ त्यांना यंदा धक्का देण्यास आतुर असेल.

उभय संघांत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने ४, तर लखनऊने २ लढती जिंकल्या आहेत. गतवर्षी लखनऊला नमवूनच बंगळुरूने अव्वल दोन संघांतील स्थान पक्के केले होते. यावेळी लखनऊला वचपा घेण्याची संधी आहे.

खेळपट्टीचा अंदाज

या लढतीवर पावसाचे सावट नसेल. चिन्नास्वामीत २२० धावांचा पाठलाग सहज केला जाऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीस प्राधान्य देऊ शकतो. खेळपट्टीवर धीम्या गतीचे चेंडू अधिक प्रभावी ठरतात. चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

logo
marathi.freepressjournal.in