चेन्नई : २० वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने (१९७ चेंडूंत २०५ धावा) शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर द्विशतकी तडाखा केला. तिच्या द्विशतकाला अनुभवी स्मृती मानधनाच्या (१६१ चेंडूंत १४९ धावा) शतकी धडाक्याची सुयोग्य साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीच ५२५ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने कसोटीच्या पहिल्या दिवशी इतक्या धावा केल्या.
उभय संघांतील या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ९८ षटकांत तब्बल ४ बाद ५२५ धावांचा डोंगर उभारला असून कर्णधार हरमनप्रीत कौर (७६ चेंडूंत ४२) आणि आणि रिचा घोष (३३ चेंडूंत ४३) खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ६०० धावांचा पल्ला गाठणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मृती व शफाली यांनी आफ्रिकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शफालीने कसोटी कारकीर्दीतील पहिल्या शतकाचेच द्विशतकात रूपांतर करताना २३ चौकार व ८ षटकारांसह २०५ धावा फटकावल्या. तर स्मृतीने २७ चौकार व १ षटकारासह १४९ धावा तडकावल्या. या दोघींनी ५२ षटकांत २९२ धावांची सलामी नोंदवली. भारतीय महिला कसोटी इतिहासातील ही सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली. तसेच स्मृतीचे हे कारकीर्दीतील दुसरे कसोटी शतक ठरले.
अखेर डेल्मी टकरने स्मृतीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सतीश शुभा (१५) लवकर बाद झाली. मात्र मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने ८ चौकारांसह ५५ धावा करताना कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. जेमिमा व शफालीने तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भर घातली. अखेर शफाली चोरटी धाव घेताना धावचीत झाली. तर टकरने जेमिमाला बाद केले. त्यानंतर हरमनप्रीत व रिचा यांनी उर्वरित १२ षटके फलंदाजी करून आफ्रिकेला हैराण केले. महिलांची कसोटी ही चार दिवसांची असल्याने येथे प्रत्येक दिवशी १०० षटकांचा खेळ होतो.
शफालीने मोडला सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम
शफालीने १९४ चेंडूंत द्विशतक साकारताना ऑस्ट्रेलियाच्या सदरलँडचा (२४८ चेंडू) सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम मोडीत काढला.
संक्षिप्त धावफलक
भारत : ९८ षटकांत ४ बाद ५२५ (शफाली वर्मा २०५, स्मृती मानधना १४९, जेमिमा रॉड्रिग्ज ५५; डेल्मी टकर २/४१)