गुलाबी कसोटीत भारताला 'लाल' शेरा! दुसऱ्या डावातही तारांकित फलंदाज अपयशी; १० गडी राखून विजयासह ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

अपेक्षेप्रमाणे गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या दिवसरात्र (डे-नाईट) कसोटीत ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. कांगारूंच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर भारताच्या रथी-महारथींनी दुसऱ्या डावातही नांगी टाकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने रविवारी या कसोटीत तिसऱ्या दिवशीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवत पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
गुलाबी कसोटीत भारताला 'लाल' शेरा! दुसऱ्या डावातही तारांकित फलंदाज अपयशी; १० गडी राखून विजयासह ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
Published on

ॲडलेड : अपेक्षेप्रमाणे गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या दिवसरात्र (डे-नाईट) कसोटीत ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. कांगारूंच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर भारताच्या रथी-महारथींनी दुसऱ्या डावातही नांगी टाकली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने रविवारी या कसोटीत तिसऱ्या दिवशीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवत पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने १९ धावांचे लक्ष्य फक्त ३.२ षटकांत तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गाठले. नॅथन मॅकस्वीनीने नाबाद १०, तर उस्मान ख्वाजाने नाबाद ९ धावा करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कने ६ बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्सच्या (५७ धावांत ५ बळी) भेदक माऱ्यापुढे भारताची भंबेरी उडाली. त्यामुळे भारताचा दुसरा डाव ३६.५ षटकांत १७५ धावांतच आटोपला. मात्र पहिल्या डावात १४० धावांची जिगरबाज खेळी साकारून कांगारूंना मोठी आघाडी मिळवून देणारा ट्रेव्हिस हेड या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला. त्यामुळे हेडलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता शनिवार, १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन (गॅबा) येथे उभय संघांतील तिसरी कसोटी खेळवण्यात येईल.

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी धूळ चारली. त्या विजयासह बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ॲडलेडवर भारताचे गुलाबी चेंडूसमोर पितळ उघडे पडले. रोहित तसेच शुभमन गिलचे पुनरागमन भारतासाठी फलदायी ठरले नाही. सराव सामन्यात भारताने विजय मिळवून तयार असल्याचे दर्शवले. मात्र प्रत्यक्षात स्टार्क, कमिन्स व स्कॉट बोलंड यांच्या त्रिकुटापुढे तसेच चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर भारताचा निभाव लागला नाही, हे या लढतीद्वारे अधोरेखित झाले. त्यामुळे आता ब्रिस्बेनपासून पुन्हा लाल चेंडूने कसोटींना प्रारंभ झाल्यावर, भारतीय संघ मालिकेत आघाडी घेईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

जवळपास ४ वर्षांपूर्वी ॲडलेड येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताचा संघ ३६ धावांत गारद झाला होता. त्या पराभवाच्या आठवणी काही चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. भारताने त्यावेळी गुलाबी कसोटी गमावूनही मालिका जिंकली होती. यंदा भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता ही ५ सामन्यांची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे महत्त्वाचे होते. परंतु आता १-१ अशा बरोबरीमुळे समीकरणे बदलली आहेत.

दरम्यान, शनिवारच्या ५ बाद १२८ धावांवरून रविवारी पुढे खेळताना ऋषभ पंत व नितीश रेड्डी यांच्यासह भारताचे तळाचे फलंदाज लढा देतील, अशी आशा होती. मात्र स्टार्कने दिवसाच्या पहिल्याच षटकात पंतचा (२८) अडसर दूर केला. मग कमिन्सने रविचंद्रन अश्विनला (७) आखूड टप्प्याच्या जाळ्यात अडकवले. तेथेच भारताचा पराभव स्पष्ट झाला. नितीशने मग आक्रमण करताना ६ चौकार व १ षटकारासह ४२ धावा फटकावल्या. पहिल्या डावातही तोच भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र नितीशला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथ लाभली नाही.

अखेर कमिन्सने त्याला व नंतर हर्षित राणाला (०) बाद करून कसोटीत एकंदर १३व्यांदा डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. मग मोहम्मद सिराज व बुमरा ही अखेरची जोडी मैदानावर असताना हेड व सिराज यांच्यात पुन्हा शाब्दिक देवाणघेवाण झाली. अखेर बोलंडच्या गोलंदाजीवर हेडनेच सिराजचा ७ धावांवर झेल टिपून भारताचा दुसरा डाव १७५ धावांत संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांच्यापुढे अवघ्या १९ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. ते कांगारूंनी मग सहज गाठले. पाच बळी घेणाऱ्या कमिन्सला बोलंडने ३, तर स्टार्कने २ गडी बाद करून उत्तम साथ दिली. रोहित (७), विराट कोहली (११) या अनुभवी फलंदाजांचे दोन्ही डावांतील अपयश सातत्याने चर्चेचा मुद्दा ठरत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधल्यामुळे आता उर्वरित ३ सामन्यांत मालिका विजयासाठी दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहता येईल, हे निश्चित.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १८०

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३३७

भारत (दुसरा डाव) : ३६.५ षटकांत सर्व बाद १७५ (नितीश रेड्डी ४२, ऋषभ पंत २८, शुभमन गिल २८; पॅट कमिन्स ५/५७)

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३.२ षटकांत बिनबाद १९ (नॅथन मॅकस्वीनी नाबाद १०, उस्मान ख्वाजा नाबाद ९)

सामनावीर : ट्रेव्हिस हेड

भारत आतापर्यंत ५ डे-नाईट कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी २०१९ वि. बांगलादेश, २०२१ वि. इंग्लंड व २०२२ वि. श्रीलंका या तीन लढती भारताने सहज जिंकल्या. मात्र २०२० व २०२४मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करला आहे.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १३ डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी तब्बल १२ लढती जिंकल्या आहेत. मुख्य म्हणजे ॲडलेडवर ऑस्ट्रेलियाने ८ पैकी एकही डे-नाईट कसोटी गमावलेली नाही, हे विशेष.

जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका

क्र. संघ सामने जय पराजय अनिर्णित गुण टक्केवारी

१. ऑस्ट्रेलिया १४ ९ ४ १ १०२ ६०.७१%

२. द. आफ्रिका ९ ५ ३ १ ६४ ५९.२६%

३. भारत १६ ९ ६ १ ११० ५७.२९%

४. श्रीलंका १० ५ ५ ० ६० ५०.००%

५. इंग्लंड २१ ११ ९ १ ११४ ४५.२४%

logo
marathi.freepressjournal.in