मुंबईच्या विजयरथाला लगाम; रोमहर्षक लढतीत उत्तर प्रदेशची २ गडी राखून सरशी

ऑफस्पिनर तनुष कोटियनने दुसऱ्या डावात ५ बळी मिळवूनही मुंबईला पराभव टाळता आला नाही. त्यामुळे सलग तीन विजयानंतर मुंबईला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबईच्या विजयरथाला लगाम; रोमहर्षक लढतीत उत्तर प्रदेशची २ गडी राखून सरशी

मुंबई : आर्यन जुयाल (१०० चेंडूंत ७६ धावा) आणि करण शर्मा (१७३ चेंडूंत ६७) यांनी झळकावलेल्या झुंजार अर्धशतकांच्या बळावर उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर २ गडी राखून सरशी साधली. ऑफस्पिनर तनुष कोटियनने दुसऱ्या डावात ५ बळी मिळवूनही मुंबईला पराभव टाळता आला नाही. त्यामुळे सलग तीन विजयानंतर मुंबईला प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ब-गटातील या सामन्यात मुंबईने दिलेले १९५ धावांचे लक्ष्य उत्तर प्रदेशने अखेरच्या दिवशी ६९.५ षटकांत गाठले. उत्तर प्रदेशचा कर्णधार नितीश राणा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. नितीशने पहिल्या डावात १०६ धावा केल्या होत्या. या पराभवानंतरही चार सामन्यांतील तीन विजयांच्या २० गुणांमुळे मुंबई गटात अग्रस्थानी विराजमान असून त्यांची आता २ फेब्रुवारीपासून बंगालशी गाठ पडेल.

रविवारच्या ८ बाद ३०३ धावांवरून पुढे खेळताना मुंबईचा दुसरा डाव ३२० धावांवर आटोपला. शिवम दुबेने ११७ धावांची शतकी खेळी साकारली, तर शम्स मुलाणीने ६३ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (९) पुन्हा अपयशी ठरला. पहिल्या डावात उत्तर प्रदेशने १२६ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे मुंबईच्या ३२०मधून १२६ धावा कमी केल्याने त्यांच्यापुढे १९५ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. दुसऱ्या डावात नितीश (६), प्रियम गर्ग (४), समर्थ सिंग (२) अपयशी ठरले. मात्र आर्यन व करणने संघाला सावरले. अखेर करणनेच अखेरपर्यंत नाबाद राहून उत्तर प्रदेशचा स्पर्धेतील पहिला विजय साकारला.

हरयाणाविरुद्ध महाराष्ट्राला फक्त १ गुणावर समाधान

अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राला हरयाणाविरुद्धच्या अ-गटातील साखळी लढतीत फक्त १ गुणावर समाधान मानावे लागले. उभय संघांतील लढत अनिर्णित राहिली. मात्र हरयाणाने पहिल्या डावात एका धावेची निसटती आघाडी मिळवली होती. हरयाणाने १९५ धावा केल्यावर महाराष्ट्राचा डाव १९४ धावांवर आटोपला. मग दुसऱ्या डावात हरयाणाने ६ बाद २११ धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे महाराष्ट्रापुढे विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य होते. मात्र त्यांनी २ बाद ९६ धावा केल्यावर दोन्ही कर्णधारांच्या संमतीने पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र ४ सामन्यांतील ११ गुणांसह गटात चौथ्या स्थानी असून त्यांच्यासमोर आता २ फेब्रुवारीपासून गतविजेत्या सौराष्ट्रचे आव्हान असेल.

विदर्भाच्या विजयात उमेश, अथर्व चमकले

अथर्व तायडेने (२२२ चेंडूंत १३८ धावा) झळकावलेल्या शतकाच्या बळावर विदर्भाने अ-गटातील लढतीत झारखंडचा ३०८ धावांनी धुव्वा उडवून अग्रस्थान पटकावले. ४ सामन्यांतील ३ विजयांसह विदर्भाच्या खात्यात १९ गुण जमा आहेत. विदर्भाने दिलेल्या ४२९ धावांचा पाठलाग करताना झारखंडचा दुसरा डाव १२० धावांतच आटोपला. उमेश यादवने ४, तर आदित्य ठाकरेने ३ बळी मिळवले. विदर्भाचा पुढील सामना राजस्थानशी होईल.

logo
marathi.freepressjournal.in