महिला क्रिकेटला नवसंजीवनी

वानखेडे तसेच डी. वाय. पाटील स्टेडियमवर टी-२० व एकदिवसीय प्रमाणेच कसोटी सामन्यांसाठीही प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्याचा प्रयत्न बीसीसीआय करू शकते.
महिला क्रिकेटला नवसंजीवनी
PM

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य देशांना कसोटी सामन्यांत नमवण्याचा पराक्रम केला. त्यातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने प्रथमच कसोटी जिंकण्याची किमया साधली. भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे देशातील महिला क्रिकेटला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळ‌ाली आहे. तसेच आपल्या संघाने मायदेशात महिलांचे अधिकाधिक कसोटी सामने आयोजित करण्यासही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रवृत्त केले आहे.

२०१४मध्ये भारतीय महिला संघ मायदेशात अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर जवळपास दशकभराने त्यांना भारतात कसोटी खेळण्याची संधी मिळाली. २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत भारत पराभूत झाला. मात्र तेथून देशातील महिला क्रिकेटचे रूप पालटले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताने त्यानंतर लक्षणीय झेप घेतली. मात्र कसोटीतील यश भारतापासून दूरच होते. भारतीय संघाने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी खेळलेल्या ३८ कसोटींपैकी फक्त ५ लढती जिंकल्या होत्या. ६ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, तर २७ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. मात्र इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशामुळे भारताचे आता ४० कसोटीत ७ विजय झाले आहेत. हरमनप्रीत गेल्या ४-५ वर्षांपासून तिन्ही प्रकारांत भारताची कर्णधार आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने २०२०च्या टी-२० विश्वचषकाची अंतिम, तर २०२३च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. २०२१मध्येही हरमनप्रीतच्या कर्णधारपदाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत कसोटी अनिर्णित राखली. आता आगामी वर्षात महिलांचा टी-२० विश्वचषक होणार असल्याने कसोटी क्रिकेटची संख्या पुन्हा कमीच होईल. वानखेडे तसेच डी. वाय. पाटील स्टेडियमवर टी-२० व एकदिवसीय प्रमाणेच कसोटी सामन्यांसाठीही प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्याचा प्रयत्न बीसीसीआय करू शकते. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ३३ हजारांची प्रेक्षकक्षमता असलेल्या वानखेडेवर तब्बल ३० हजारांहून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली. यावरूनच महिला क्रिकेट पुन्हा एकदा बहरत असल्याचे समजते. तसेच मार्च महिन्यात महिलांच्या आयपीएलचा दुसरा हंगामही रंगेल. एकंदरच भारतीय संघाच्या कामगिरीमुळे महिला क्रिकेटला नवी चालना मिळाली असून हे भविष्याच्या दृष्टीने आशादायी आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in