सायकलिंग, रग्बी, जलतरण यांसारख्या क्रीडाप्रकारांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून तृतीयपंथांना हद्दपार करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. याविरोधात भारताची आघाडीची धावपटू द्युती चांद आवाज उठवला आहे. एकेकाळी तूसुद्धा पुरुष आहेस, अशा प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागमाऱ्या द्युतीने जगभरातील क्रीडा संघटनांना तृतीयपंथी खेळाडूंवरील बंदी मागे काढून त्यांना मुक्तपणे खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.
गेल्या रविवारी जलतरण महासंघाने तृतीयपंथी महिला क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निलंबित केले. वयाच्या १२व्या वर्षांपर्यंतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असे आदेश जलतरण महासंघाने काढले. त्यानंतर रग्बी आणि सायकलिंग महासंघानेसुद्धा याचा कित्ता गिरवला. यामुळे जगभरात वेगळीच चळवळ सुरू झाली असून फुटबॉल, अॅथलेटिक्स, नेटबॉलचे आंतरराष्ट्रीय महासंघ तृतीयपंथी खेळाडूंविषयी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
त्यामुळे २६ वर्षीय द्युतीने महिला खेळाडूंविरोधातील या निलंबनाला रद्द करण्याची मागणी केली आहे. “तृतीयपंथी महिला खेळाडूंना त्यांच्या आवडीच्या खेळात कारकीर्द घडवण्यापासून रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांनी गेल्या काही वर्षांत असंख्य पदके कमावल्यामुळे अनेकांना हे पाहावले नसेल. परंतु लिंग भेद न करता कोणत्याही खेळाडूला खेळण्याचा अधिकार आहे,” असे द्युती म्हणाली.
“तृतीयपंथी असल्यामुळे त्या महिला खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा विशेष लाभ होत नाही. त्यांना आधीच समाजात वावरताना असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे क्रीडा महासंघांनी त्यांच्यावरील बंदी हटवून त्यांना हवे त्या संघाकडून खेळण्याची मुभा द्यावी,” असेही द्युतीने सांगितले.
अमेरिकेची जलतरणपटू लिया थॉमसने काही दिवसांपूर्वी एनसीसीए जलतरण अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी पहिली तृतीयपंथी ठरण्याचा मान मिळवला. परंतु त्यानंतर जलतरण महासंघाने अशा खेळाडूंवर बंदी घातल्यामुळे तिनेसुद्धा या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे.